Kalki 2898 AD Day 1 Prediction :  सुपरस्टार प्रभासची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) पहिल्याच दिवशी विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. मेगाबजेट चित्रपट असलेला कल्की 2898 एडी हा 27 जून रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र, त्याआधीच चित्रपट विक्रम रचणार असल्याची चिन्हे आहेत. अॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशीच्या शोच्या 13 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख तिकिटे ही फक्त हैदराबाद येथील आहेत.

  


कल्की 2898 एडी'  (Kalki 2898 AD) हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट आहे. जवळपास 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक एका वर्षापूर्वी सॅन डिएगो कॉमिक कॉन येथे रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू झाली होती. 


'कल्की'ने रिलीज आधीच रचला विक्रम


हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित होत आहे. आगाऊ बुकिंगच्या माध्यमातून चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 35 कोटींची कमाई केली आहे. अंदाजे 600 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाला त्याची किंमत वसूल करण्यासाठी पहिल्या वीकेंडला आणि आठवड्यात चांगली कमाई होणे आवश्यक आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद हा तेलगू भाषेत मिळत आहे. हैदराबादमध्ये चित्रपटाने पहिल्या दिवशी आतापर्यंतची सर्वात मजबूत प्री-सेल्सचा विक्रम केला आहे.


पहिल्याच दिवशी किती होणार कमाई?


या चित्रपटाने केवळ हैदराबादमधून 14 कोटींची कमाई केली असून या यादीत दुसऱ्या क्रमांकावर प्रभासचा चित्रपट 'सालार' आहे. या चित्रपटाने 12 कोटींची कमाई केली होती. हैदराबादमध्ये आजपर्यंतच्या सर्वाधिक कमाईच्या बाबतीत प्रभासने स्वतःच्याच चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ओपनिंग डे कलेक्शनच्या अंदाजाविषयी बोलताना, सॅकॅनिल्कने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन सुमारे 200 कोटी रुपये असू शकते. भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई सुमारे 120 कोटी रुपये असू शकते आणि परदेशातील बॉक्स ऑफिसचा गल्ला हा  60 कोटींपेक्षा जास्त असू शकतो. 


निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनवर मोठा खर्च करत आहेत, मार्केटिंग स्ट्रॅटेजी पाहता चित्रपटाला ओपनिंग डे कलेक्शन चांगले होईल असे वाटते, पण रिलीजनंतरही चित्रपटाची कमाई त्याच गतीने सुरू राहील का? असा प्रश्नही निर्माण होत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या हाती सिनेमा असणार आहे.


प्रभास या चित्रपटात भैरवची भूमिका साकारत असून त्याच्याशिवाय अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांसारखे कलाकार 'कल्की 2898 एडी'मध्ये झळकणार आहेत. 


इतर महत्त्वाची बातमी: