BTS : देशात आणि जगभरात क्वचितच असा कोणी संगीतप्रेमी असेल, ज्याला 'बीटीएस' (BTS) हे नाव माहीत नसेल. दक्षिण कोरियन बँड ‘बीटीएस’चे (BTS) चाहते जगभरात विखुरलेले आहेत. या बँडचे प्रत्येक गाणे चाहत्यांना खूप आवडते आणि त्यांची गाणी अगदी सहज टॉप ट्रेंडमध्ये स्थान मिळवतात. मात्र, आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता बीटीएस बँडचे हे सगळे कलाकार हातात गिटारऐवजी बंदूक घेणार आहेत. अर्थात, आपण आपल्या देशाचे काहीतरी देणे लागतो हाच भाव मनात ठेवून हे सगळे कलाकार आता सैन्यात भरती होणार आहेत.


BTS या हिट बँडचे सर्व सदस्य सैन्यात (लष्करी सेवा) सामील होणार असल्याची अधिकृत माहिती त्यांच्या कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. या निवेदनात, संगीत कंपनीने सांगितले की, BTSचे कलाकार ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापासून सैन्यात सामील होणार आहेत.



देशसेवेसाठी ‘BTS’ बॉईज तयार!


दक्षिण कोरिया या देशाच्या कायद्यानुसार दक्षिण कोरियातील प्रत्येक पुरुषाला वयाची 30 वर्ष पूर्ण होण्याआधी लष्करी सेवा पूर्ण करावी लागते. मीडिया रिपोर्टनुसार, देशाप्रती असेलेले हे कर्तव्य पार पाडण्यासाठी बीटीएसचा कलाकार जिन सगळ्यात आधी सैन्यात भरती होणार असून, त्याची भारती प्रक्रिया पूर्ण होत आली आहे.


दक्षिण कोरिया हा असा देश आहे, जो नेहमी युद्धक्षेत्रात असतो. त्यांना त्यांच्या शेजारी देश उत्तर कोरियाशी युद्धाची भीती नेहमीच असते. युद्धाच्या प्रसंगी जास्तीत जास्त मनुष्यबळाची आवश्यकता असते, म्हणून दक्षिण कोरियाच्या सरकारने एक नियम केला आहे की, 18 ते 30 वर्षे वयोगटातील प्रत्येक तरुणाने वयाची 30 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी सैन्यात दोन वर्षे सेवा करणे बंधनकारक आहे. याच नियमांनुसार बीटीएस सदस्य लवकरच देशासेवेत सामील होणार आहेत.


2025मध्ये करणार पुनरागमन!


‘BTS’ हा जगातील सर्वात मोठा संगीत बँड आहे. या बँडमध्ये सात कलाकारांची टीम आहे आणि प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. आता BTS कलाकार लष्करी कर्तव्यावर जाणार असून, हा बँड काही वर्षांसाठी ब्रेकवर जाणार आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, बीटीएस टीम लष्करी सेवा पूर्ण केल्यानंतर 2025मध्ये पुन्हा एकदा एक बँड म्हणून परत येईल. या बँडचा सदस्य जिन सगळ्यात आधी सैन्यात भरती होणार असून, त्या आधी ऑक्टोबरमध्ये त्याचा सोलो अल्बम रिलीज होणार आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर तो लगेच लष्करी सेवेसाठी रवाना होईल. त्यानंतर उर्वरित सदस्यही आपापल्या हातातील कामे पूर्ण करून भरती प्रक्रियेला सुरुवात करतील.


हेही वाचा :


BTS Army, KBC 14 : ‘केबीसी 14’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी विचारला ‘BTS’बद्दल प्रश्न! तुम्हाला माहितेय का उत्तर?