Anant Amabni-Radhika Merchant Wedding :   रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत 12 जुलै रोजी पार पडणार आहे. बुधवारपासून त्यांच्या विवाहाच्या विधी सुरू झाल्या आहेत. त्याआधी अनंत-राधिकाचा ग्रँड प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. गुजरातमधील जामनगरमध्ये  आणि  परदेशात क्रूझवर प्री-वेडिंग फंक्शन पार पडले होते. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक  सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते. आता, या दोघांच्या ग्रँड विवाह सोहळ्यानिमित्ताने आयोजित  कार्यक्रमात पॉप आयकॉन जस्टिन बीबर (Justin Bieber) धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहे. 


बीबर भारतात दाखल...


तरुणाईमध्ये क्रेझ असलेला पॉप सिंगर जस्टीन बीबर हा  4 जुलै 2024 रोजी सकाळी मुंबईत दाखल झाल्याचे वृत्त आहे.  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित पार्टीत तो परफॉर्मन्स करणार आहे. जस्टीन बीबर हा 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या फंक्शनमध्ये परफॉर्म करणार आहे. 






अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा 5 जुलै 2024 रोजी होणार आहे आणि कुटुंब त्याची तयारी करत आहे. जस्टिन बीबर व्यतिरिक्त बादशाह आणि करण औजला देखील मोठ्या रात्री परफॉर्म करण्याची शक्यता आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे मित्र एक संगीत नाटक देखील सादर करतील ज्यामध्ये ते जोडप्याची प्रेमकथा दाखवतील.


जस्टीन बीबरने  किती मानधन घेतलं?


जस्टीन बीबर हा आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर असून त्याची लोकप्रियता अनेक देशांमध्ये आहे. एका शोसाठी जस्टीन बीबर हा तगडं मानधन आकारतो. एका रिपोर्टनुसार, जस्टीस बीबर हा एका शोसाठी 50 कोटींचे मानधन आकारतो. मुकेश अंबानी यांच्या खासगी सोहळ्यासाठी जस्टीन बीबर खास हजेरी लावणार असल्याने बीबरने यापेक्षा अधिक मानधन आकारल्याची चर्चा आहे.  


आणखी कोण परफॉर्म करणार?


जामनगर येथील प्री-वेडिंग फंक्शनमध्ये पॉप सिंगर रिहानाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता, जस्टीन बीबरही हजेरी लावणार आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, अॅडेल, ड्रेक, लाना डेल रे आदी कलाकार हे 12 ते 14 जुलै दरम्यान होणाऱ्या फंक्शनसाठी परफॉर्म करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठीची चर्चा सुरू आहे.