आपल्या वाट्याचं चित्रीकरण पूर्ण करुन नाना पाटेकर गुरुवारी रात्रीच जैसलमेरहून जोधपूरला रवाना झाले होते. आज दुपारी 12.30 च्या सुमारास नाना जोधपूर विमानतळावर पोहोचले आणि जोधपूरहून 1.45 च्या सुमारास जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केलं. यानंतर नाना पाटेकर दुपारी 4 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बाहेर पडले.
यावेळी विमानतळावर प्रतीक्षा करणाऱ्या मीडियाने त्यांना घेरलं. परंतु नानांनी या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला. मात्र पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर, ते म्हणाले की, "दहा वर्षांपूर्वीच मी याबाबत बोललो आहे. जे खोटं आहे, ते खोटंच आहे."
तनुश्री दत्ताच्या आरोपांवर पत्रकार परिषद घेण्याच्या प्रश्नावर नाना एवढंच म्हणाले की, "लवकरच घेणार."
दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. त्यानतंर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं.
तनुश्री दत्ताचा आरोप
अनेक वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली होती की, "नानांचा महिलांशी छेडछाड करण्याचा इतिहास आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहित आहे की, ते महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेत्रींवर हातही उगारला आहे."
'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला.
संबंधित बातम्या
तनुश्रीचा नानांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग
राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती : तनुश्री दत्ता
तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपांवर बिग बींची प्रतिक्रिया
तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला
बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल