Jitendra Awhad : विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना हाणामारी करण्याचा माझा उद्देश नव्हता. मारामारी करणाऱ्या समर्थकांना चांगलंच खडसावलं आहे. तसेच मी मारहाण केली नसल्याचं प्रेक्षकांनी स्पष्ट केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 


'हर हर महादेव' या सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये शो बंद पाडला. तिथे झालेल्या राड्याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांना काल जामीन मिळाला. आजही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आहे.


एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र आव्हाड म्हणाले, "शिवाजी महाराजांचं विकृतीकरण हे बाबासाहेब पुरंदरेंच्या परंपरेतलं आहे. 'हर हर महादेव' या सिनेमात शिवाजी महाराजांना अरे तुरे बोलणारे बाजीप्रभू देशपांडे दाखवण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांची बाजीप्रभूंवर निष्ठा होती. बाजीप्रभूंविषयी त्यांच्या मनात आदर होता. जेधे आणि बांदल हे दोघेही प्रामाणिक सैनिक होते. पण सिनेमात त्यांची बदनामी करण्यात आली आहे.  शिवकालीन इतिहासाची उलटी बाजू सिनेमात दाखवण्यात आली आहे. मराठी आणि मराठ्यांना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आला आहे."


सिनेमातील एका प्रसंगाविषयी आव्हाड म्हणाले, "अफजलखानाची सगळी माहिती शिवाजी महाराजांना बाजीप्रभू देशपांडेंनी दिली. तसेच शिवाजी महाराज जेव्हा अफजलखानाला मारतात तेव्हा अफजलखानाला कसा मारतात हे डोळे बंद केलं तरी महाराष्ट्रासमोर येतं. हा इतिहास पानोपानी, गल्लोगल्ली लोकांच्या डोक्यात भरलेला आहे. तरीही सिनेमात शिवाजी महाराज दोन खांब लातेने उडवतात. अफजलखान हवेत उंच उडून महाराजांच्या मांडीवर येऊन पडतो आणि महाराज त्याचे पोट फाडतात असं दृश्य दाखवण्यात आलं आहे". 


एका प्रेक्षकाला झालेल्या मारहाणीच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना आव्हाड म्हणाले, " या मारहाणीमुळे महत्त्वाचा मुद्दा बाजूला राहिला आहे. मी संबंधित व्यक्तीची माफी मागितली आहे. प्रेक्षकांना हाणामारी करण्याचा उद्देश नव्हता. मारामारी करणाऱ्या समर्थकांना चांगलच खडसावलं आहे. मी मारहाण केली नसल्याचं प्रेक्षकांनी स्पष्ट केलं आहे". 


जितेंद्र आव्हाडांची पुढील भूमिका काय?


पुढील भूमिकेविषयी भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "शिवाजी महाराजांसाठी फाशी झाली तरी चालेल. महाराजांसाठी हा मावळा कधी शांत बसणार नाही. महाराजांसाठी मावळा सदैव लढणार."  


संबंधित बातम्या


Jitendra Awhad: शिवरायांच्या बदनामीला विरोध केल्याने मला अटक, त्यामागे आम्ही काहीही करु शकतो ही मानसिकता: जितेंद्र आव्हाड