मुंबई : किंगखान, बादशाह, मेगास्टर, सुपरस्टार अशी अनेक विशेषणं एका व्यक्तीशी जोडली गेली आहेत, ही व्यक्ती म्हणजे अर्थातच बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान. नुकताच या किंगचा प्रिन्स म्हणजेच आर्यन खान एका ड्रग्स पार्टी प्रकरणामुळे अनेक दिवसांपासून तुरुंगवसात होता. 30 ऑक्टोबरला आर्यनची जामिनावर सुटका झाली आणि शाहरुख खानला अनेक दिवसांनी पाहिल्यांदाच त्याच्या चाहत्यांनी हसताना पाहिलं. या प्रकरणानंतर किंगखान शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी चारचौघात झापल्याचा एक किस्सा पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
3 नोव्हेंबर 2017 ची गोष्ट आहे. शाहरुख आपल्या अलिबागमधल्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करुन परत येत होता. अलिबागहून जेव्हा शाहरुख आपल्या बोटीनं गेट वे ऑफ इंडिया इथं आला, त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी गेट वेवरच मोठी गर्दी केली होती. याचवेळी आमदार जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेनं निघाली होती. मात्र, शाहरुख खानची बोट पार्क होईपर्यंत जयंत पाटलांना वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी चाहत्यांसमोरच शाहरुखला सुनावलं.
जयंत पाटील यांनी शाहरुखला काय सुनावलं?
‘असशील तू कोणीही मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग काय तुम्ही खरेदी केलं का?, माझ्या परवानगीशिवाय तू येऊ शकत नाही अलिबागला.’ अशा शब्दात त्यांनी शाहरुखला सुनावलं. . जयंत पाटील आपल्या बोटीने पुढे गेल्यानंतर शाहरुख शांतपणे बोटीतून बाहेर पडतो आणि निघून जातो. शाहरुख यावेळी जयंत पाटील यांना काहीच उत्तर न देता निघून गेला.
तरीही शाहरुख शांतच होता!
दरम्यान, जयंत पाटलांचा राग अनावर झाल्यानं शाहरुखने बोटीत बसून राहणंच पसंत केलं. यावेळी त्यानं कोणतंही उत्तर त्यांना दिलं नाही. पाटील आपल्या बोटीकडे निघून गेल्यानंतरच शाहरुख आपल्या बोटीतून बाहेर आला. शाहरुख बाहेर येताच त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, हा संपूर्ण प्रकार तेथील एका चाहत्यानं रेकॉर्ड केला.
शाहरुख खानची एकंदरीत कहाणी ही फार प्रेरणादायी आहे. त्याच्याकडून खूप कही शिकण्यासारखं आहे पण किंग असो वा बादशाह, चुकीला माफी नाही असंच म्हणावं लागेल.