Jaya Bachchan : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. निर्माती म्हणून त्यांनी काही यशस्वी टीव्ही मालिकांची निर्मिती केली. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर जया बच्चन या अभिनयाच्या क्षेत्रापासून चार हात लांब राहिल्या. जया बच्चन  यांनी कुटुंबासाठी त्याग केला असल्याची चर्चा असते. मात्र, एका मुलाखतीत त्यांनी या प्रश्नावर मौन सोडले. 


खासदार असलेल्या जया बच्चन आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जातात. कोणत्याही गोष्टीवर  त्या सडेतोडपणे मत व्यक्त करतात. जया बच्चन यांनी आपली नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली होती.  या पॉडकास्टमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांवर स्पष्ट उत्तरे दिली. ज्यावेळी तुमच्याबद्दल एखादी व्यक्ती फारशी माहिती नसताना मत बनवते, त्यावेळी तुम्हाला काय वाटतं असे विचारण्यात आले. 


अमिताभ बच्चन यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिलसिला या चित्रपटात जया बच्चन यांच्या अभिनयाला दाद मिळाली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. आपण हा निर्णय कुटुंबासाठी घेतला होता, असे जया बच्चन यांनी सांगितले. आपला वेळ हा नवरा आणि मुलांसोबत घालवण्यासाठी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला असल्याचे जया बच्चन यांनी स्पष्ट केले.


या निर्णयावर ज्यावेळी लोक मी त्याग केला वगैरे म्हणतात, हे मला बिलकुल पटत नाही असे जया बच्चन यांनी सांगितले.ज्या वेळी मी काम करणे बंद केले तेव्हा अनेकांनी मी मुलांसाठी, कुटुंबासाठी करिअरचा त्याग केला, बळी दिला असे म्हणायचे. मात्र, असे काही नव्हते. एक आई आणि पत्नीच्या जबाबदारीमध्ये मी आनंदी होते. ज्या भूमिका मला मिळत होत्या, त्याऐवजी मी या भूमिकेत अधिक आनंदी होते असेही जया बच्चन यांनी  म्हटले. ती एक नवीन भूमिका होती. जी मी स्वीकारली, कोणताही त्याग केला नव्हता असेही जया बच्चन यांनी स्पष्ट केले. 


जया बच्चन यांनी 1998 मध्ये 'हजार चौरासी की माँ' या चित्रपटातून कमबॅक केले होते. त्यानंतर 2000 मध्ये हृतिक रोशनची भूमिका असलेल्या 'फिजा' या चित्रपटात दिसले. त्यानंतर करण जोहरच्या 'कभी खुशी, कभी गम' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. जया बच्चन या ठाराविक चित्रपटात काम करत आहेत.