मुंबई : मुंबईत दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना यांच्यावर आयकर विभागाने काल छापेमारी केली.  रात्रभर ही छापेमारी सुरु होती. यादरम्यान तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची पुण्यात चौकशीही झाली. आयकरची छापेमारी कायदेशीररित्या झाली आहे असं केंद्र सरकारने सांगितलं तर सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीने केला.


फँटम फिल्मशी संबंधित लोकांवर छापेमारी


टॅक्स चोरीच्या प्रकरणात आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. अनुराग कश्यप, तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल, मधू मंटेना आणि फँटम फिल्मशी संबंधित लोकांवर छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाला माहिती मिळाली होती की फँटम सिनेमाच्या कमाईत टॅक्सची चोरी झाली होती. फँटम सिनेमात जो पैसा कमावला गेला त्याची योग्य माहिती देण्यात आलेली नाही.


आयकर विभागाकडून अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिवाईस ताब्यात 


आयकर विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या छापेमारीत अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिवाईस आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. टॅक्स चोरीच्या रकमेचं वाटप कसं झालं? यातून काय काय खरेदी करण्यात आलं किंवा मनी लॉण्ड्रिंगसाठी ही रक्कम परदेशात तर पाठवली गेली का? याची माहिती आयकर विभाग घेत आहे.


मुंबई, पुण्यात 22 ठिकाणी छापेमारी


आयकर विभागाने मुंबई, पुणे येथे 22 ठिकाणी छापेमारी केली. अनुराग कश्यपच्या फ्लॅटवरही छापा टाकण्यात आला. आयकर विभागाचं पथक फँटम फिल्मच्या कार्यालयातही गेलं होतं. आज देखील ही कारवाई सुरु राहू शकते.


क्वान कंपनीचे चार अकाऊंट्स सीज


मधू मंटेना यांच्या मुंबईतील घरावरही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. मधू मंटेना यांची कंपनी क्वान टॅलेंट मॅनेजमेंटच्या अंधेरी येथील कॉमर्स सेंटरवरही आयकरच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. यानंतर क्वान कंपनीचे चार अकाऊंट्स सीज करण्यात आले.


आयकर कारवाईवरुन राजकरण सुरु


आयकरच्या या छापेमारीवरुन राजकारण देखील सुरु झालं आहे. अनुराग कश्यप सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. अनेकदा त्याने केंद्र सरकारच्या कारभार धोरणावर टीका केली. यामुळेच्या आयकरच्या या कारवाईवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जाता आहे.