मुंबई : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवराम यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा नुकत्याच रंगल्या होत्या. त्यानंतर हार्दिक पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिकचं नाव बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्तासोबत जोडलं जात आहे.


एका पार्टीमध्ये ईशा आणि हार्दिक यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं चित्र आहे. सध्या दोघांनी 'चोरी चोरी चुपके चुपके'च आपलं डेटिंग सुरु केल्याचं म्हटलं जात आहे.

ईशा फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. जन्नत 2 चित्रपटातून 2012 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने हमशकल्स, रुस्तम, बादशाहो सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती 'पलटण', हेराफेरी 3, आँखे 2 या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवरामचं ब्रेकअप?

हार्दिक स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवरामच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. खरंतर हार्दिक किंवा एली, या दोघांपैकी कोणीही आपलं अफेअर असल्याचं खुल्लमखुल्ला सांगितलं नव्हतं. त्यामुळे साहजिकच आपल्या ब्रेकअपबद्दल ते उघडपणे बोलणार नाहीत.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हार्दिकचा भाऊ, क्रिकेटपटू कृणाल पांड्याच्या लग्नात एलीने उपस्थिती लावली होती, तेव्हाच दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.