मुंबई : अभिनेता इरफान खान सध्या लंडनमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. अशातच इरफानच्या चाहत्यांसाठी एक दुखद बातमी आहे. प्रकृती अस्वस्थामुळे इरफानने काही प्रोजेक्ट्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर इरफानने आपल्या या निर्णयाची माहिती दिली. कर्करोगाचं निदान होण्यापूर्वी इरफानने जे प्रोजेक्ट साईन केले होते, त्यात आता इरफान दिसणार नाही.


इरफानला ज्यावेळी कर्करोग झाल्याचं कळालं, त्यावेळी तो अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची एक वेब सीरिज शूट करत होता. या वेब सीरिजची बरीच शुटिंग झाली होती. मात्र आपल्या आजारपणाची माहिती मिळाल्यानंतर इरफान शुटिंग सुरु ठेवू शकला नाही.


इरफानने म्हटलं की, काही महिन्यांपूर्वी AIBच्या टीमसोबत शुटिंग केल्यानंतर मला मोठ्या जड अंत:करणाने सांगावं लागत आहे की, माझ्या आजारपणामुळे मला माझ्या अॅक्टिंगच्या कमिटमेंट्स पूर्ण करता येणार नाहीत.



काही दिवसांपूर्वीच इरफानवर सहाव्यांदा केमो थेरपी करण्यात आली आहे. पाचव्यांदा केमो थेरपी झाली त्यावेळी इरफान खुप अशक्त झाला होता. काही दिवसांपूर्वी इरफानची एक मुलाखत समोर आली आली होती, त्यामध्ये इरफानने आपला आजार आणि उपचाराची माहिती दिली होती. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर इरफानची ही पहिली मुलाखत होती. त्यावेळी मी आजारपणाच्या चौकशीबाबतच्या प्रश्नांना आता वैतागलो आहे. आता गळ्यात बोर्ड बांधून काही महिन्यात मी मरणार असल्याचं लोकांना सांगावं असं वाटत असल्याचं मुलाखतीत इरफानने म्हटलं होतं.


मुलाखतीत उपचाराबाबत बोलताना इरफान म्हटला होता की, "केमोच्या चार थेरपी झाल्या असून आणखी दोन बाकी आहेत. त्यानंतर स्कॅन होणार. तिसऱ्या किमोनंतर रिपोर्ट्स सकारात्मक होते. मात्र सहा किमोनंतरच्या स्कॅननंतर योग्य माहिती माहिती समोर येईल. आयुष्याचा काही भरवसा नाही. मला आयुष्यात खुप काही मिळालं. मान्य करतो की मी डोळ्यावर पट्टी बांधून चालत होतो. मला जीवनात काम मिळालं हे मी पाहू नाही शकलो. "