दुबई : बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. मृत्यूच्या चौकशीनंतर पार्थिव कपूर कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलं. पार्थिव दुबईतील एका शवगृहात ठेवण्यात आलेलं होतं, तेव्हा ते भारतात पाठवण्यासाठी एका भारतीयानेच मदत केली.


दुबईतील अशरफ शेरी थामारासरी यांनी कपूर कुटुंबीयांना मदत केली. अशरफ शेरी हे मूळचे केरळचे आहेत. ते संयुक्त अरब अमिरातमध्ये मृत पावणाऱ्या लोकांना आपल्या मायदेशात पाठवण्यासाठी मदत करतात.

अशरफ शेरी यांनी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत आतापर्यंत 4700 मृतदेह संयुक्त अरब अमिरातमधून जगभरातील 38 देशांमध्ये पाठवण्यासाठी मदत केली आहे. ही मदत करणं आपली नैतिक जबाबदारी असल्याचं अशरफ शेरी सांगतात.

लोकांच्या आशीर्वादासाठी आणि दुबईत कुणाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह आपल्या देशात कसा न्यायचा याबाबत लोकांना फार माहिती नसते, यामुळेही मदत करतो, असं अशरफ शेरी म्हणाले. त्याचप्रमाणे श्रीदेवींचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठी अशरफ शेरी यांनी नैतिक जबाबदारी समजून मदत केली.