Salman Khan Host Filmfare Awards 2023 : 'फिल्मफेअर चित्रपट महोत्सव' (Filmfare Awards 2023) हा सिनेविश्वातील मानाचा पुरस्कार सोहळा आहे. सिनेसृष्टीत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. लवकरच 68 वा चित्रपट महोत्सव पार पडणार असून या महोत्सवात सलमान खान (Salman Khan) सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.


68 व्या फिल्मफेअर चित्रपट महोत्सव कधी पार पडणार? 


68 व्या फिल्मफेअर चित्रपट महोत्सवाकडे संपूर्ण सिनेविश्वाचं लक्ष लागलं आहे. येत्या 27 एप्रिलला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सौजन्याने आयोजित करण्यात येणारा 68 वा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार हा अत्यंत दिमाखदार, देखणा आणि भव्यदिव्य स्वरुपाचा असणार आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा पहिल्यांदाच फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. 






68 व्या फिल्मफेअर चित्रपट महोत्सवात विकी कौशल, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर आणि जॅकलीन फर्मांडीसचे बहारदार परफॉर्मन्स ठेवण्यात आले आहेत. हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना 28 एप्रिलला कलर्स वाहिनीवर रात्री 9 वाजता पाहता येणार आहे. 


68 व्या फिल्मफेअर चित्रपट महोत्सवाबद्दल सलमान खान म्हणाला...


सलमान खान 68 व्या फिल्मफेअर चित्रपट महोत्सवाबद्दल म्हणाला,"फिल्मफेअर चित्रपट महोत्सवाचा गेल्या काही दिवसांपासून मी हिस्सा आहे. फिल्मफेअरने हिंदी सिनेसृष्टीच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या जगभरात क्रेझ असणाऱ्या या चित्रपट महोत्सवाचं सूत्रसंचालन करण्यासाठी मी उत्सुक आहे. या महोत्सवात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा सन्मान-सत्कार करण्यासाठी फिल्मफेअरने हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो".  


सलमान खान गेल्या काही दिवसांपासून धमकीप्रकरणामुळे चर्चेत आहे. याप्रकरणानंतर आता तो सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावू लागला आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटन कार्यक्रमानंतर सलमानने 68 व्या फिल्मफेअर चित्रपट महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावली. त्यावेळी तो म्हणाला,"मी सर्वांचाच भाई नाही... काही लोकांचा भाई आहे तर काहींचा 'जान' आहे". 


पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की,"68 व्या फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे सौजन्य लाभले आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे, सांस्कृतिक वारसा हे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. याचा फायदा महाराष्ट्रातील पर्यटनालाही होणार असून यामुळे पर्यटन वाढून राज्याच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्यास त्याची मदत होईल". 


संबंधित बातम्या


Salman Khan: जीवे मारण्याची धमकी, सलमान खानने अखेर मौन सोडलं, म्हणाला...