मुंबई: भारतीय हवाई दलाने एक ट्वीट करुन AK vs AK या चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृष्ये वगळावीत असं नेटफ्लिक्सला सांगितलंय. हवाई दलाच्या गणवेशातील अनिल कपूर हवाई दलाला चुकीच्या पध्दतीने रंगवतोय असा आक्षेप घेत यातील काही आक्षेपार्ह दृष्य वगळावीत असं सांगितलं आहे.


या ट्रेलरमध्ये हवाई दलाच्या गणवेशातील अनिल कपूरने वापरलेली भाषा ही अर्वाच्य असून ती भारतीय हवाई दलाच्या नियमांचं उल्लंघन करते अशाही प्रकारचा आक्षेप हवाई दलानं घेतलाय.





नेटफ्लिक्सने भारतातील पहिला मॉक्यूमेन्ट्री ड्रामा AK vs AK चा एक ट्रेलर रिलीज केला. त्यात अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांचा एक सीन दाखवण्यात आला आहे. यामध्ये अनिल कपूरच्या मुलीचे, सोनम कपूरचे अपहरण करण्यात आलेलं असल्याचं दाखवण्यात आलंय. अनुराग कश्यप अनिल कपूरला दहा तासांच्या आत सोनमला शोधायचं आव्हान देतो. त्यानंतर हवाई दलाच्या गणवेशातील अनिल कपूर त्याच्या मुलीला शोधण्यासाठी सर्वत्र भटकत असल्याचं दाखवण्यात आलंय.


या चित्रपटात अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यात संघर्ष दाखवण्यात आलाय. सोनम कपूरच्या अपहरणाभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसते.


अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यादरम्यान आक्षेपार्ह भाषेत संवाद दाखवण्यात आला आहे. त्यात जी भाषा वापरण्यात आलीय त्यावर आता हवाई दलानं आक्षेप घेत हवाई दलाचं चुकीच्या पध्दतीनं चित्र रंगवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आक्षेप घेतलाय.