Ibrahim Ali Khan Bollywood Movie : बॉलिवूड स्टार सैफ अली खानचा (Saif Ali Khan) लेक इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता म्हणून इब्राहिम आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटात बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूरही काम करणार आहे.
'झूम' ने दिलेल्या एका वृत्तानुसार,'नादानिया' असे चित्रपटाचे नाव असणार आहे. 'नादानिया' चित्रपटाची निर्मिती करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत होणार आहे. त्यामुळे करण जोहरने आणखी दोन स्टार किड्सला बॉलिवूडमध्ये झळकवण्याची तयारी केली असल्याची चर्चा रंगली आहे.
इब्राहिम सध्या करतोय करण जोहरसोबत काम
इब्राहिम अली खान सध्या करण जोहरसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. त्याने करणला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात असिस्ट केले होते. खुशी कपूरने झोया अख्तरच्या 'द आर्चिज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. खुशीच्या त्या चित्रपटाला सरासरी प्रतिसाद मिळाला. त्यात सुहाना खान आणि अमिताभचा नातू अगस्त्य नंदा यांच्यासह अनेक स्टार किड्स होते.
रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार 'नादानियां'
'नादानियां'मध्ये इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहेत आणि अशा परिस्थितीत संपूर्ण चित्रपटाचा भार त्यांच्या खांद्यावर असेल. ही एक रोमँटिक कॉमेडी असेल असे सांगण्यात येत आहे. पण इब्राहिम आणि खुशी कपूर स्वतःला सिद्ध करू शकतील की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल.
करणने आतापर्यंत कोणत्या स्टार किड्सना लाँच केले?
करणने यापूर्वी त्याच्या 'धडक' चित्रपटातून खूशी कपूरची बहीण जान्हवी कपूरला लॉन्च केले होते. जान्हवीच्या आधी करण जोहरने सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि वरुण धवनला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी दिली. त्याशिवाय, संजय कपूरची मुलगी शनाया हिलाही चित्रपटांमध्ये लाँच करत आहे. इब्राहिमप्रमाणेच वरुण आणि सिद्धार्थही करणच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते.