मुंबई : करणी सेनेनं त्रास द्यायचं थांबवलं नाही तर मी पण राजपूत आहे सर्वांना उद्ध्वस्त करेन, असा इशारा अभिनेत्री कंगना रनौतने दिला आहे. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाला महाराष्ट्र करणी सेनेनं विरोध केला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी तो दाखवण्यात यावा, अशी मागणी करणी सेनेनं केली आहे. मणिकर्णिका या सिनेमात राणी लक्ष्मीबाई साकारणाऱ्या कंगना रानौतने करणी सेनेची मागणी धुडकावून लावली आहे. तिने आपण राजपूत असल्याचा दाखला दिला आहे.


'मणिकर्णिका  : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा चार इतिहासकारांनी प्रमाणित केल्याची माहिती कंगनाने दिली आहे. सेन्सॉर बोर्डाकडूनही या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. शिवाय करणी सेनेलाही कळवण्यात आलं होतं. तरीही करणी सेनेनं मला  किंवा या सिनेमाशी संबंधित कोणालाही त्रास देणं थांबवलं नाही, तर मी एकेकांना उद्ध्वस्त करेन, असा इशारा कंगना रनौत यांनी दिला आहे. केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी या सिनेमाचं गाणं लिहलं आहे. शिवाय या सिनेमातून देश प्रेम व्यक्त करा असा मेसेज देण्यात आला आहे असं प्रसून जोशी म्हणाले आहे. कंगनाने अशी माहिती दिली.

या सिनेमात राणी लक्ष्मीबाई यांचे एका ब्रिटीश अधिकाऱ्यासोबत संबंध दाखवण्यात आल्याच्या काही बातम्या आल्यानंतर करणी सेनेनं या सिनेमाला विरोध सुरु केला आहे. रिलीज करण्यापूर्वी चित्रपट करणी सेनेला दाखवण्यात यावा, अन्यथा हा सिनेमा चित्रपटगृहात चालू देणार नाही अशी भूमिका करणी सेनेनं घेतली आहे. सिनेमा रिलीज करु नका म्हणून या सेनेनं मणिकर्णिकाच्या निर्मात्यांच्या ऑफिससमोरही निदर्शनं केली.

यापूर्वीही 2017 मध्ये करणी सेनेनं पद्मावत चित्रपटला विरोध केला होता. चुकीच्या पद्धतीने राणी पद्मावती यांना या चित्रपटात दाखवण्यात आलं असल्याचा ठपका ठेवत करणी सेनेनं देशभरात या चित्रपटाला विरोध केला होता. सोबत दीपिका पदुकोणची नाक कापण्याची धमकी सुद्धा दिली होती. आता तिच करणी सेना कंगना रनौतच्या मणिकर्णिका चित्रपटाला विरोध करत आहे. मात्र कंगनाने करणी सेनेला सडेतोड उत्तर देण्याचं ठरवलं आहे.

25 जानेवारीला होणार रिलीज

कंगनाने या सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. या सिनेमात कंगनासह अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डॅनी डेन्जोंगपा, सुरेश ओबेरॉय यांसारखे कलाकार दिसणार आहे. 25 जानेवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी राष्ट्रपती भवनमध्ये स्पेशल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.