मुंबई : 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'च्या प्रदर्शनानंतर तीन आठवड्यांनी अभिनेता आमीर खानने चित्रपट फ्लॉप झाल्याने प्रेक्षकांची माफी मागितली आहे. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या अपयशाची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो, असं आमीरने मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितलं.

आमीर म्हणाला की, "मी आणि माझ्या संपूर्ण टीमने सिनेमा उत्तम बनवण्यासाठी फार मेहनत केली होती होती. पण आमच्याकडून काहीतरी चूक झाली, असं मला वाटतं. मी या चुकीची जबाबदारी स्वीकारतो. आम्ही आमच्या परीने पूर्ण मेहनत केली होती, यावर विश्वास ठेवा."

ठग्स ऑफ हिंदोस्तानमुळे आमीर ट्रोल, पाहा सोशल मीडियावरील मजेशीर मीम्स

"जे प्रेक्षक अपेक्षा ठेवून चित्रपट पाहायला आले, त्यांची मी माफी मागतो. यावेळी मी त्यांचं मनोरंजन करु शकलो नाही. आम्ही प्रयत्न तर केले होते. पण जे लोक अपेक्षेने आले, त्यांना तो आवडला नाही. मला या गोष्टीचा अतिशय खेद आहे. माझे चित्रपट मला माझ्या मुलांप्रमाणे असतात," असं सांगत आमीरने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' 8 नोव्हेंबरला देशभरात प्रतिसाद झाला होता. अमिताभ बच्चन, आमीर खान, कतरिना कैफ यांसारखे मोठे कलाकार असूनही चित्रपटाने कसातरी 150 कोटींचा आकडा पार केला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सिनेमाने 50 कोटी रुपयांची कमाई केली होती, पण हळूहळू कमाईचा आकडा घसरत गेला.

दरम्यान, 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' डिसेंबर महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबाबत निर्मात्यांनी पूर्ण तयारी केली आहे. भारतात या सिनेमाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता चीनमध्ये सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागेल.