पणजी: अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची घटस्फोटीत पत्नी सुझान खान यांच्यातील जवळीक दिवसेंदिवस पुन्हा वाढू लागली आहे. त्याची प्रचिती पुन्हा एकदा मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आली.
हृतिक आणि सुझानने त्यांच्या मुलाचा वाढदिवस गोव्यात एकत्र येऊन साजरा केला.
हृतिक आणि त्याची घटस्फोटीत पत्नी सुझान खान शनिवारी मुलगा हृधानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आली. हृतिकने सुझानसमवेत मुलाचा वाढदिवस सासष्टी तालुक्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा केला. यावेळी बॉलिवूडमधील काही मोजकीच मंडळी उपस्थित होती.
यावेळी हृतिकने सुझानसोबत ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ या त्याच्या गाजलेल्या चित्रपटातील सेनोरीटा हे गाणे गाऊन वाढदिवसाच्या पार्टीत रंग भरला.
2014 साली हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट झाला होता. अलीकडे दोघांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होऊ लागली आहे. मुलांच्या वाढदिनी हे दोघेही प्रत्येकवर्षी एकत्र येतात.
इतकेच नव्हे तर वाढदिवसही उत्साहात साजरा करतात.
हृधानच्या वाढदिवसाच्या पार्टीला हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्याबरोबरच हृतिकची जवळची मैत्रीण सोनाली बेंद्रे,जायेद खान, गोल्डी बेहल आणि इतर काही निकटवर्तीय मंडळी उपास्थित होती.
हॉटेलच्या हिरवळीवर खास गोमंतकीय डीजेला आमंत्रित करण्यात आले होते. संगीताच्या तालावर हृतिक रोशनने गाणी सादर केली. यावेळी गोमंतकीय कलाकार उपस्थित होते.