बेळगाव : मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्डब्रेक कमाई केलेल्या ‘सैराट’ चित्रपट कन्नडमध्ये कर्नाटकात प्रदर्शित झाला आहे. पण पहिल्या दिवशी मात्र अपेक्षेएवढी गर्दी कन्नड सैराटने खेचली नाही. पण चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या सिनेरसिकांनी मात्र मराठीपेक्षा कन्नड सैराट हिट होणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले.
बेळगावात दोन चित्रपटगृहात कन्नड सैराट प्रदर्शित करण्यात आला असून, पहिल्या खेळाला मात्र रसिकांची संख्या चित्रपटगृहात कमीच होती. दहावीची परीक्षा सुरु असल्यामुळे आणि पहिल्या दिवशी मराठी, कन्नड भाषिक गर्दी करणार म्हणून देखील पहिल्या खेळाला गर्दी झाली नाही, असे मत एका सिनेरसिकाने व्यक्त केले.
दुसऱ्या खेळापासून मात्र सिनेगृहात बऱ्यापैकी रसिकांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. मराठी सैराट पाहिलेल्या अनेकांनी उत्सुकतेपोटी कन्नड सैराट कसा झालाय हे पाहण्यासाठी मुद्दाम पहिल्या दिवशीचा खेळ पाहिला.
कन्नड सैराट मधील आर्चीची भूमिका रिंकू राजगुरूनेच केली आहे. रिंकूचा अभिनय चांगला झाल्याचे मत चित्रपटाचा पहिला शो पाहिलेल्यानी व्यक्त केले. परशाची भूमिका कन्नडमध्ये निशांत या नवोदित अभिनेत्याने बजावली आहे.
चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका बजावलेल्या महांतेश डोणी यांनी बेळगावला येऊन मुद्दाम पहिला शो आपल्या मित्रपरिवारासमवेत पाहिला.
मराठी सैराटला संगीत दिलेल्या अजय अतुल यांनीच कन्नड सैराटला संगीत दिले आहे . मराठी सैराट प्रमाणेच कन्नड सैराट मनसू मल्लिगे हिट होणार आणि बेळगावमध्ये शंभर दिवस पूर्ण करणार असा आशावाद मराठी आणि कन्नड सैराट पाहिलेल्या रसिकांनी व्यक्त केला आहे .