Sir Premacha Kay Karaycha : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रेक्षक मनोरंजनासाठी सिने-नाट्यगृहात जात आहेत. त्यामुळेच  सिने-नाट्यगृहाबाहेर सध्या हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने 8 मार्च ते 12 मार्च दरम्यान महिला कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कलामहोत्सवात विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर होणार आहेत. कलामहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या मकरंद देशपांडेंच्या (Makrand Deshpande) 'सर, प्रेमाचं काय करायचं' (Sir Premacha Kay Karaycha) या नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला आहे. 


महिलाविषयक प्रबोधन, माहितीपर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे या महोत्सवादरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कलामहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या 'सर, प्रेमाचं काय करायचं' या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सर आणि त्यांच्या तीन विद्यार्थ्यांच्या भवती फिरणारं कथानक असलेल्या या नाटकात मकरंद देशपांडे, आकांशा गाडे, निनाद लिमये, माधुरी गवळी आणि अजय कांबळे प्रमुख भूमिकेत आहेत. 


महिला कलामहोत्सवाची सुरुवात मीना नाईक यांच्या पॉक्सो कायद्यावर आधारित 'अभया' या एकपात्री प्रयोगापासून झाली. पोक्सो या बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील कायद्याबाबत जनजागृती करणार हे नाटक आहे.


'सर प्रेमाचं काय करायचं' या नाटकाला प्रेक्षकांनी लावलेली हजेरी ही विशेष उल्लेखनीय होती. नाटकाच्या महिला दिन विशेष प्रयोगाला प्रेक्षकांनी उभं राहून 5 मिनिट टाळ्या वाजवून कलाकारांना दाद दिली. शासनाच्या 100 टक्के प्रेक्षक उपस्थितीच्या निर्णयाच स्वागत मकरंद देशपांडे यांनी केलेच पण त्याच बरोबर 'महिला दिन' निमित्ताने नाटकाचा खास प्रयोग सादर करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाचे विशेष आभार मानले. 


मकरंद देशपांडे म्हणाले,"महिला कला महोत्सवातून समाजाला 'स्त्री' साहित्याकडे ओढ निर्माण होऊ शकते. तसेच त्यातून अनेक स्त्रियांच्या मनात कला विभागात आपलं पाऊल ठेवण्यास विश्वास निर्माण होईल ही खात्री आहे. मंगळवारचा प्रयोग आणि तो ही तुडुंब गर्दीत हे अविस्मरणीय आहे. नाटकाला लागणारी दाद देणारा प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत आणण्यासाठी असे अनेक कला महोत्सव होवो". 


संबंधित बातम्या


Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्सऑफिसवर धमाका, 100 कोटींचा आकडा पार


आगामी 'या' चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दिसणार महिलांचा दबदबा, नेटफ्लिक्सकडून टॉप चित्रपटांची यादी प्रसिद्ध


Sharmaji Namkeen : ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार; ‘शर्माजी नमकीन’ची रिलीज डेट जाहीर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha