मुंबई : 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केल्यानंतर खुद्द या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी मौन सोडलं आहे. तनुश्रीच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचा दावा राकेश सारंग यांनी केला आहे. विशेष म्हणजे तनुश्रीच्या कारची तोडफोड झाल्याशी मनसेचाही काहीही संबंध नसल्याचंही सारंग म्हणाले.

'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका आयटम साँगसाठी आम्ही तनुश्री दत्ताला विचारलं. ती तयार झाली. या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य करत होते. मुळात गणेशला आपण काम मिळवून दिल्याचा तनुश्रीचा दावाही खोटा आहे. कारण माझी पत्नी संगीताने गणेशचं नाव सुचवलं होतं.' असं राकेश सारंग यांनी सांगितलं.

'त्या आयटम साँगसाठी आम्ही फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये मोठा सेट उभारला होता. जवळपास 250 डान्सर्स होते. पहिल्या दिवशी तनुश्री आली, तेव्हा क्राऊडने तिला पाहून शिट्या वाजवल्या, बोंबाबोंब केली. शेवटी मीच आवाज दिला की लाथ मारके एक-एक को भगादूंगा. दुसऱ्या दिवशी नाना पाटेकर आला. परत शिट्या-बोंबाबोंब. नाना आणि तनुश्री यांनी मजा-मस्ती केली. सेटवर एकूणच हलकंफुलकं वातावरण होतं. त्यामुळे आम्हीही खुश होतो. त्यावेळी माझ्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. नुकतंच प्लास्टर काढलं होतं. त्यामुळे मी एकाच जागी बसून होतो, फार हालचाल करायचो नाही' असं पुढे राकेश सारंग म्हणाले.

'तिसऱ्या दिवशी तनुश्री सेटवर आली, तीच फुगलेली होती. त्यामुळे आमच्या टीममध्ये चर्चाही रंगली, की आज हिचा मूड खराब दिसत आहे. त्या दिवशी नानासोबत तिने दोन डान्स शॉट्सही दिले. लंच झाला. लंचमध्ये तिच्या मेकअपमनने मला बोलावलं तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावलं. मी त्याला म्हटलं, माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे, मॅडमला विचार तुम्ही याल का. पण तरी ती आली नाही, शेवटी मी हळूहळू तिच्या व्हॅनमध्ये गेलो.' असं सारंग म्हणाले.

'मी व्हॅनमध्ये गेलो तर ती फुरंगटून बसली होती. तिचे डोळे लाल झाले होते. ती माझ्याकडे रोखून बघत होती. मलाही कळेना काय झालं. तितक्यात ती अर्वाच्य शब्दात नानाबद्दल बोलायला लागली. ती काय बोलली हे मला आता सांगताही येणार नाही, इतकी तिची भाषा अर्वाच्य होती. ती म्हणाली की नानाला माझ्यापासून दूर ठेवा. मी डान्स करते तेव्हा तो का बघतो. मी तिची समजूत घातली की तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल.' असं म्हणून व्हॅनमधून बाहेर पडल्याचं राकेश सारंग यांनी सांगितलं.

'सेटवर येऊन मी माझ्या असिस्टंटना विचारलं, की इथे काही वादावादी झाली का? तर ते नाही म्हणाले. नाना आपल्याला स्पर्श केल्याचं तिने नंतर सांगितलं, त्यामुळे आधी मला वाटलं भांडण झालं असेल. नाना मस्करीत काहीतरी बोलला असेल आणि वाद झाले असतील. तितक्यात नाना तिथे आला. मी त्याच्याशी पब्लिसिटीविषयी बोललो.' असं सारंग म्हणाले.

'पुढचा डान्स सिक्वेन्स नानासोबत होता, पण ती येणार नसल्याचं तिच्या मेकअपमननी सांगितलं. नाना टच नही करेगा, असं ती म्हणत होती. आम्ही सगळे जाऊन तिचा दरवाजा ठोठावून आलो, पण मॅडम बाहेर येईना. सध्या बॉलिवूडमध्ये नाव कमावलेली अभिनेत्री डेझी शाह गणेशची असिस्टंट होती, ती गेली तरी दरवाजा उघडेना. जवळपास चार तास ती आत बसून होती.' असं पुढे राकेश सारंग म्हणाले.

'अखेर ती बाहेर आली. मै जा रही हू, मुझे करना नही है, असं म्हणत ती निघून गेली. आम्ही पत्रकारांना बोलावलं नव्हतं, पण त्यांना कुठून तरी समजलं.  2008 मध्ये दीड कोटी रुपये खर्च करुन आयटम डान्स करणं मोठी गोष्ट होती. मी प्रेसला मुलाखत दिली नाही, गणेशनेही दिली नाही.' असंही सारंग म्हणाले.

तनुश्री बाहेर जाताना काहीतरी बाचाबाची झाली. तिचा हात लागून एकाचा कॅमेरा तुटला. ती घाईघाईत गाडीत बसली आणि तिची गाडी एका पत्रकाराच्या पायावरुन गेली. त्यामुळे सगळे जण गाडीमागे धावले. जो राडा झाला तो प्रेस आणि तनुश्री दत्तामध्ये. आम्ही तिथे गेलोही नाही. पोलिस आले. तनुश्री आणि संबंधित पत्रकारांना घेऊन पोलिस स्टेशनला गेले. त्यांनी एकमेकांविरोधात एफआयआर दाखल केली.' असं राकेश सारंग यांनी स्पष्ट केलं.

'नानाने आधीच एफआयआर दाखल केल्याचा तनुश्रीचा आरोप धादांत खोटा आहे. नानाला आम्ही सांगितलंच नव्हतं. कारण तेव्हा सांगितलं असतं, तर मोठा राडा झाला असता. तो चिडला असता. आम्ही दुसऱ्या दिवशी नानाला सांगितलं. ते ऐकून  नानाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने प्रेस कॉन्फरन्स बोलावली. ती आपल्या मुलीच्या वयाची असल्याचं नानाने रडत सांगितलं. ती असं का बोलते, हे मलाच समजत नसल्याचं नाना म्हणाला.' असं राकेश सारंग म्हणाले.

'मुळात ही घटना घडल्याचा दावा ती करते, तेव्हा चारशे पाचशेचा मॉब उपस्थित होता. इतक्या जणांसमोर कोणी गैरवर्तन करेल का? नानाने तिच्या गालाला टच करता येईल, अशी स्टेप अॅड केल्याचा तिने केलेला दावाही खोटा आहे. त्यात, मनसेचा या घटनेशी मुळात काहीच संबंध नाही. जो नाना कधीच कोणाला घाबरला नाही, तो राज ठाकरेंना फोन करुन सांगेल का, की तुझे गुंड पाठव?' असे सवाल उपस्थित करत तनुश्री हे निव्वळ पब्लिसिटीसाठी करत असल्याचा दावाही राकेश सारंग यांनी केला.

आम्ही नंतर तिच्याशी संपर्क साधला. निर्मात्याने तिच्याविरोधात 'सिन्टा' या असोसिएशनमध्ये तक्रार केली. नुकसान मागितलं. त्या मीटिंगला ती आलीही होती. तिने आपली एकही फ्रेम वापरायची नाही, असं सांगत पाच लाख रुपये मागितले. आम्ही दिले, असंही राकेश सारंग म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती, ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात, असं तनुश्री दत्ता म्हणाली होती. ''नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो,'' असा आरोप मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने केला. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मनसे कार्यकर्त्यांनी माझी कार फोडली असा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. यावेळी तिने थेट राज ठाकरेंवरच आरोप केले आहेत. तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. हा आरोप केल्यापासून तनुश्री दत्ता चर्चेत आहे.

काय आहे प्रकरण?

'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला होता.


तो 'सोलो' डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री सांगते.


पाहा राकेश सारंग यांची संपूर्ण मुलाखत