मुंबई : निर्मात्या विनता नंदा आणि अभिनेत्री संध्या मृदुल यांच्या आरोपानंतर आता अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनीही ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आलोकनाथ यांनी एनएसडीमध्ये शिकत असताना रुममध्ये घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिमानी शिवपुरी यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं होतं एनएसडीमध्ये?
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) शिकत असताना अभिनेते आलोकनाथ हे हिमानी शिवपुरी यांचे सिनियर होते. त्यावेळी एकदा आलोकनाथ मद्यधुंद अवस्थेत हॉस्टेलमध्ये आले आणि आपल्या रुममध्ये घुसल्याचा आरोप हिमानी शिवपुरींनी केलाय.
“आलोकनाथ यांनी काही अतिप्रसंग करण्याआधीच मी आरडा-ओरड केली. त्यामुळे हॉस्टेलमध्ये राहणारे इतर लोक गोळा झाले आणि आलोकनाथ यांना तिथून पळवून लावले.”, असा गंभीर आरोप हिमानी शिवपुरींनी केला.
अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी अभिनेते आलोकनाथ यांच्यासोबत ‘हम आपके हैं कौन’, ‘परदेस’, ‘हम साथ साथ है’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले असून, काही मालिकांमध्येही आलोकनाथ आणि शिवपुरींनी सोबत काम केलंय.
आलोकनाथ हे दारु प्यायल्यानंतर पूर्णपणे बदलून जातात आणि हेच त्यांच्या समस्येचं मूळ आहे, असं हिमानी शिवपुरींनी सांगितलं.
काही वर्षांपूर्वी इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्सच्या कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना, ते सातत्याने दारु पित होते. त्यावेळीही ते हिंसक झाले होते. त्यावेळी त्यांची पत्नी आशुही सोबत होती, अशी माहिती हिमानी शिवपुरींनी दिली. यावेळी हिमानी शिवपुरींनी आलोकनाथ यांच्या आणखी एका कारनाम्याची कथा सांगितली. दुबई विमानतळावर उघड्यावर लघवी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडले होते.
फिल्म इंडस्ट्रीत अनेक मुली लैंगिक शोषणाला बळी पडतात. मात्र कुणी जाहीर बोलण्यास धजावत नाही. कारण काम मिळणार नाही, याची त्यांना भीती वाटते, असेही शिवपुरी म्हणाल्या.
विनता नंदा आणि संध्या मृदुल यांचेही आलोकनाथ यांच्यावर आरोप
प्रसिद्ध अभिनेत्री संध्या मृदुल यांनीही आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. काही वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत आलोकनाथ यांनी आपल्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा संध्या मृदुल यांनी ट्विटरवरुन केला आहे. त्याआधी 'तारा' मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनीही आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.