मुंबई : ब्लॅक, युवा, वीर झारा सारख्या चित्रपटांतून गाजलेली अभिनेत्री राणी मुखर्जी मुलीच्या जन्मानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'हिचकी' सिनेमातून राणी कमबॅक करत असून याचा ट्रेलर लाँच झाला आहे.


राणीच्या उपस्थितीत यशराज फिल्म्सच्या ऑफिशियल फेसबुक हँडलवरुन लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून हा ट्रेलर लाँच करण्यात आला.

राणी मुखर्जी 'हिचकी'मध्ये नैना माथुर या शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. मात्र नैनाला टॉरेट सिंड्रोम हा न्यूरोसायकिअॅट्रिक डिसॉर्डर झाला आहे. त्यामुळे तिच्या घशातून अचानक 'चक-चक' असे आवाज येतात.

तिच्या या आजाराची सहकारी शिक्षक, विद्यार्थी खिल्ली उडवतात. तिला नोकरीवर ठेवण्यास मनाई केली जाते. मात्र तिच्या खंबीर भूमिकेमुळे तिला नोकरीवर ठेवलं जातं. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तिची नेमणूक होते. त्यानंतर येणारे अडथळे आणि त्यावर केलेली मात हा सिनेमाचा प्रवास आहे.

त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूने ही शिक्षिका कशी ठाम उभी राहते, हे पाहताना अंगावर काटा येतो. सिद्धार्थ मल्होत्राचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर :