मुंबई : अभिनेता सलमान खान गणपती बाप्पाचा केवढा मोठा भक्त आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे सलमान आणि त्याचं कुटुंब मागील 14 वर्षांपासून गणेश उत्सव दणक्यात साजरा करतं.

पण सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये यंदा गणरायाचं आगमन होणार नाही. "माझी गणपतीवर अपार श्रद्धा आहे, कारण त्याने मला प्रत्येक संकटातून बाहेर काढलं आहे," असं तो एकदा म्हणाला होता. मग असं काय झालं की यंदा सलमान खानच्या घरी बाप्पा विराजणार नाही?

तर याचं कारण आहे की, यंदा सलमानची लाडकी बहिण अर्पिताच्या घरी गणपतीचं आगमन होणार आहे. यानंतर गणेशोत्सवादरम्यान अर्पिताच्या घरीच गणपतीची पूजा-अर्चा करण्याचा निर्णय संपूर्ण कुटुंबाने घेतला आहे.

खरंतर अर्पितानेच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणपती आणण्याची सुरुवात केली होती. यानंतर दरवर्षी सलमान खानच्या घरी धुमधडाक्यात गणपतीचं आगमन होत असे.

दरम्यान सलमान खान सध्या अबूधाबीमध्ये ‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे तो गणेशोत्सवाला मुंबईत असेल की नाही याबाबत शंका आहे. मागील वर्षीही सलमान ‘ट्यूबलाईट’च्या शूटिंगमुळे गणेशोत्सवाला इथे नव्हता.

‘टायगर जिंदा है’मध्ये सलमान खान कतरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मोठ्या काळानंतर सिल्व्हर स्क्रीनवर सलमान-कतरिनाची जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे.