Hema Malini Reaction On Dharmendra Health : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) सध्या प्रकृतीच्या कारणाने चर्चेत आहेत. तब्येत बिघडल्याने उपचारांसाठी ते अमेरिकेला (USA) गेल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत होते. पण आता धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) यांनी चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.
टाईम्स नाऊ न्यूजसोबत बातचित करताना हेमा मालिनी म्हणाल्या,"धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे. रुटीन हेल्थ चेकअप करण्यासाठी ते अमेरिकेला गेले आहेत. काळजी करण्यासारखं काहीही नाही. सनी देओलची बहीण अमेरिकेत राहत असल्याने ते तिथे गेले आहेत". धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे".
नेमकं प्रकरण काय?
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने उपचारांसाठी सनी देओल (Sunny Deol) त्यांना अमेरिकेला घेऊन गेला आहे. तसेच पुढील 20 दिवस तो त्यांच्यासोबतच राहणार असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यांचं वय 87 वर्ष असून अनेकदा त्यांच्या तब्येतील चढ-उतार होत आहेत. पण चिंता व्यक्त करण्यासारखं काहीही नाही. त्यानंतर धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करू लागले.
धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Dharmendra Movie Updates)
धर्मेंद्र (Dharmendra) हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजही आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ते चाहत्यांना भूरळ घालतात. एकीकडे चाहते त्यांच्या तब्येतीसाठी चिंता व्यक्त करत असले तरी दुसरीकडे चाहत्यांना त्यांच्या आगामी सिनेमांची उत्सुकता आहे.
धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील धर्मेंद्र यांच्या अभिनयाचं चाहत्यांनी कौतुक केलं. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात धर्मेंद्र यांच्यासह आलिया भट्ट, रणवीर सिंह, जया बच्चन आणि शबाना आझमी महत्त्वाच्या भूमिकेत होते. अमेरिकेतून आल्यानंतर धर्मेंद्र आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. 'अपने 2', 'इक्कीस' आणि 'शाहिद कृती फिल्म' हे धर्मेंद्र यांचे आगामी सिनेमे आहेत.
सनी देओलच्या 'गदर 2'चा बॉक्स ऑफिसवर धमाका
सनी देओल सध्या धर्मेंद्र यांच्यासोबत अमेरिकेला गेला असला तरी चाहत्यांमध्ये त्याच्या 'गदर 2' यास सिनेमाची क्रेझ कायम आहे. 'गदर 2' हा सिनेमा प्रदर्शित होऊन 33 दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत भारतात या सिनेमाने 516.08 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 674 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या