Zombivali : 'झोंबिवली' या मराठी चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयानं हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील 260 सिनेमागृहात हा सिनेमा बुधवारी 26 जानेवारीला प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. कॉपीराईटच्या मुद्यावर सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या एका अन्य निर्मात्यानं प्रदर्शनाविरोधातील आपली मागणी सुनावणी अखेर मागे घेतल्यानं त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्याच्या याचिकेवर 3 फेब्रुवारीला सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे.
तरूण वाधवा या एका चित्रपट निर्मात्याने 'झोंबिवली' या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात स्वामित्व हक्काचे उल्लंघन केल्याचा दावा करत याचिका दाखल केली आहे. मे 2018 मध्ये 'झोम्बी' या प्रसिद्ध अशा संकल्पनेवर आधारीक या चित्रपटाची कल्पना सारेगामाच्या युडल फिल्म्स या शाखेकडे त्यानं सादर केली होती. त्यावर युडलने वाधवा यांना संपूर्ण पटकथा सादर करण्यास सांगितले. आपण पटकथा पूर्ण केल्यानंतर आपल्याला यात आता काही स्वारस्य नसल्याचं सांगत त्यांनी आपला प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र त्यानंतर जुलै 2020 मध्ये सारेगामाने 'झोंबिवली' या आगामी चित्रपटाची घोषणा केली. त्याची मूळ कथा आपलीच असल्याचा दावा वाधवा यांनी याचिकेतून केला असून या चित्रपटाची कल्पना आणि त्या संबंधित सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही याचिकेतून केला आहे. त्यावर न्यायमूर्ती एस. काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
तेव्हा, सारेगामाने चित्रपटासाठी आपली मूळ कल्पना वापरली असून हा गोपनीयतेचा भंग आहे. तसेच सारेगामाने स्वामित्व हक्काचे उल्लंघन केल्याचा आरोपही वाधवा यांच्याकडून करण्यात आला. ज्याचा सारेगामाकडून तीव्र विरोध करण्यात आला. तसेच आपण वाधवा किंवा इतर कोणाचीही कल्पना चोरलेली नसल्याचा दावाही बाचवपक्षाचे वकील हिरेन कुमुद यांच्यावतीनं करण्यात आला. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर हायकोर्टानं स्पष्ट केलं की, गोपनीयतेचा भंग आणि स्वामित्व हक्काचे उल्लंघन यांचा जवळचा संबंध आहे. अनेक प्रकरणात या दोन्ही गोष्टी घडलेल्या पहायला मिळतात. पण, सदर प्रकरणात मात्र स्वामित्व हक्काचं उल्लंघन झालेलं नसून गोपनीयतेच्या कराराच्या भंगामध्ये याचा समावेश होऊ शकला असता. कारण, वाधवा यांच्या आरोपांनुसार त्यांनी एक कल्पना गोपनीयतेच्या करारांतर्गत सारेगामाला ऐकवली होती आणि सारेगामा ती वाधवा यांच्या परवानगीशिवाय वापरू शकत नव्हतं. पण, एखाद्या कल्पनेवर स्वामित्व हक्क सांगितला जाऊ शकत नाही. तसंच, वाधवा हे स्वामित्व हक्काचं उल्लंघन झालेल्या साहित्याखेरीज अन्य सामग्रीविषयी स्पष्ट माहिती सादर करण्यात अपयशी ठरलेत त्यामुळे आता प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ते थांबवणं शक्य नाही.
'झोंबिवली' हा या संकल्पनेवर आधारीत मराठीतील पहिला हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. मराठीत पहिल्यांदाच 'झोम्बी'वर आधारित चित्रपट येत असून त्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेलं आहे. या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट बुधवारी राज्यभरातील 260 चित्रपटगृहात झळकणार आहे.
संबंधित बातम्या
Padma Awards : 'पृथ्वीराज' सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, सोनू निगम यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर
Happy Republic Day 2022 : या प्रजासत्ताक दिनी 'हे' देशभक्तीपर सिनेमे पाहाच!
KGF2 ते Brahmastra पर्यंत 'हे' सात बिग बजेट सिनेमे 2022 मध्ये होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha