मुंबई: कॉल डिटेल्स रेकॉर्ड अर्थात सीडीआर केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे पोलिसांना मोठी झाप झाप झापलं.


याप्रकरणी अटकेत असलेल्या अॅड. रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडण्याचे निर्देश बुधवारी हायकोर्टानं जारी केले. मुळात ठाणे पोलिसांनी केलेली ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगत कायद्यापेक्षा पोलीस स्वत:ला वरचढ समजतात का? असा सवाल विचारत आपला संताप व्यक्त केला.

कायदा हातात घेऊन बेकायदेशीरपणे रिझवानला अटक करणाऱ्या ठाणे पोलिसांतील संबंधित अधिकाऱ्याविरोधात चौकशीचे निर्देशही हायकोर्टानं दिलेत. तसेच पोलिसांनी कायद्याच्या कक्षेत राहून आरोपीविरोधातील कारवाई सुरु ठेवावी असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं.

सीडीआर प्रकरण: कंगणासह, आयशा श्रॉफचं नाव!

रिझवानच्या अटकेविरोधात त्याची पत्नी तस्निमनं मुंबई उच्च न्यायालयात हबिस कॉर्पस अंतर्गत याचिका दाखल केली होती. कोणतीही पूर्व कल्पना न देता रात्री उशिरा ही अटक केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर ठाणे पोलिसांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढत हायकोर्टानं सरकारी वकिलांना थेट सवाल केला होता की, तुम्ही स्वत:हून आरोपीला सोडणार आहात? की आम्ही तसे आदेश जारी करू? यावर ठाणे पोलिसांनी माघार घेत आमची रिझवानला सोडण्यास हरकत नसल्याची कबुली कोर्टासमोर दिली.

हायकोर्टानं रिझवान सिद्दीकीला तात्काळ सोडण्याचे निर्देश देताच त्याच्या वकील पत्नीला कोर्टात अश्रू अनावर झाले. या निकालानंतर आपली प्रतिक्रिया देताना रिझवान सिद्दीकीचे वकील रिझवान मर्चंट यांनी ठाणे पोलिसांवर थेट पक्षपातीपणाचा आरोप केला.

या संपूर्ण प्रकरणात बॉलिवूड स्टार नवाझुद्दीन सिद्दीकीला पाठीशी घालण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

या केसमध्ये चौकशी दरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंनी रिझवान सिद्दीकीमार्फत सीडीआर मिळवल्याचा आरोप ठाणे पोलिसांकडून करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

सीडीआर प्रकरण : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलांना अटक 

सीडीआर प्रकरण: कंगणासह, आयशा श्रॉफचं नाव!