Bhumi Pednekar Birthday : बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आज (18 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. भूमी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात वेगळी छाप सोडली आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने आज हा टप्पा गाठला आहे.


वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचे पितृछत्र हरपले होते. भूमीच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले होते. त्यावेळी भूमी 18 तर, समीक्षा 15 वर्षांची होती. या दीर्घ आजाराशी वडिलांना झुंजताना पाहणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. वडिलांच्या निधनानंतर भूमीचे संपूर्ण कुटुंब कोलमडून गेले होते. मात्र, या कठीण काळातही त्यांनी स्वतःला सावरले. भूमीच्या आईने संपूर्ण कुटुंबाला एकसंध बांधून ठेवले. भूमीचे वडील देवाघरी गेल्यानंतरची दोन वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत हालाखीची होती. मात्र, या काळात त्यांनी भरपूर मेहनत केली.


असा मिळाला पहिला चित्रपट!


अभिनेत्री होण्याआधी भूमीने यशराज फिल्म्ससाठी शानूची असिस्टंट म्हणून काम केले होते. शानू शर्मा हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहेत. भूमी पेडणेकर हिने आयुष्मान खुराना अभिनीत ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून भूमीने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. 'दम लगा के हैशा' या चित्रपटात भूमी स्वत: सहाय्यक दिग्दर्शक होती. या चित्रपटासाठी 100 मुलींनी ऑडिशन दिले होते. पण यातील एकही मुलीचे सिलेक्शन झाले नाही. यानंतर भूमीने स्वतः काही सीन करून मुलींना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा अभिनय कास्टिंग टीम आणि दिग्दर्शकाला इतका आवडला की, या चित्रपटात भूमीलाच कास्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चित्रपटातील ‘संध्या’ या पात्रासाठी भूमीला तिचे वजन 10 ते 12 किलोने वाढवावे लागले होते.


सामाजिक विषयावरील चित्रपटांत केले काम!


‘दम लगा के हैशा’नंतर भूमी पेडणेकरला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. मात्र, तिने एकापाठोपाठ एक सलग 24 चित्रपट नाकारले. याबद्दल बोलताना भूमी म्हणाली की, 'दम लगा के हैशा'ने लोकांचा लठ्ठपणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. या चित्रपटानंतर तिला 24 चित्रपटांच्या ऑफर आल्या, पण त्याच्या कथा तिला आवडल्या नाहीत आणि म्हणून तिने नकार दिला. भूमीने अशा मुद्द्यांवरही चित्रपट केले आहेत, जे इतर नायिका करण्यास टाळाटाळ करतात. तिने 'शुभ मंगल ज्‍यादा सावधान' आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा' सारखे चित्रपट केले आहेत, ज्यात समाजाला आरसा दाखवण्यात आला. काही विषयांवर लोक उघडपणे बोलायलाही कचरतात, अशा भूमिका तिने साकारल्या आहेत.


हेही वाचा :


Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरनं शेअर केले ग्लॅमरस लूकमधील फोटो; हुमा कुरेशी म्हणाली, 'कॉपी कॅट'


PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा ग्लॅमरस अंदाज; नाईट सूटमध्येही दिसते खास!