Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज (11 ऑक्टोबर) आपला 80वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले की, आठवतो तो त्यांचा भारदस्त आवाज आणि त्याच शैलीतील त्यांची दमदार संवादफेक. आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करणाऱ्या या महानायकाने बॉलिवूड चित्रपटांचे अनेक संवाद गाजवले. आजही त्यांचे अनेक संवाद प्रेक्षकांना आणि चाहत्यांना तोंडपाठ आहेत. काही संवाद तर, आजच्या घडीला अनेकदा सहज म्हणून गप्पा मारताना देखील वापरले जातात. चला तर, त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्ताने अशाच काही गाजलेल्या संवादांवर एक नजर टाकूया...


अग्निपथ


1990मध्ये रिलीज झालेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली चांगलीच जादू दाखवली होती.  या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलने चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण केली होती. या चित्रपटातील बिग बींची डायलॉग डिलिव्हरीची खास स्टाईल खूप लोकप्रिय झाली होती. या चित्रपटातील “विजय दीनानाथ चौहान पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उमर 36 साल, नौ महीना आठ दिन सोलहवां घंटा चालू है।“, हा डायलॉग आजही तितकाच प्रसिद्ध आहे.


कालिया


1980च्या ‘कालिया’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेली व्यक्तिरेखा अतिशय हटके होती. या चित्रपटात जेलर बनलेल्या प्राण यांच्यासोबतचे बिग बींचे संवाद विशेष गाजले. या चित्रपटातील “हम भी वो हैं, जो कभी किसी के पीछे खड़े नहीं होते। जहां खड़े हो जाते हैं, लाइन वहीं शुरू होती है” हा संवाद विशेष गाजला होता.


दीवार


अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या संवादांवर बोलताना त्यात ‘दीवार’ या चित्रपटाचे नाव कसे बरं मागे राहील? हा चित्रपट बिग बीच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील एक नव्हे तर अनेक संवाद प्रचंड गाजले. “तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूं... इसे अपनी जेब में रख ले पीटर, अब ये ताला मैं तेरी जेब से चाबी निकाल कर ही खोलूंगा”, “हां, मैं साइन करूंगा, लेकिन... जाओ पहले उस आदमी का साइन लेकर आओ, जिसने मेरे हाथ में ये लिख दिया था”, “मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता...” या संवादांनी तुफान टाळ्या मिळवल्या.


मोहब्बतें


यश चोप्रा दिग्दर्शित ‘मोहब्बतें’ हा चित्रपट 2000मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बिग बींच्या करिअरचा टर्निंग पॉईंट मानला जातो. शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन स्टारर या चित्रपटात अमिताभ बच्चन एका गुरुकुलचे प्राचार्य बनले होते. या चित्रपटातील “परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन... ये इस गुरुकुल के तीन स्तंभ हैं। ये वो आदर्श हैं, जिनसे हम आपका आने वाला कल बनाते हैं” हा संवाद आजही अनेकदा सोशल मीडियावर ऐकायला मिळतो.


डॉन


‘डॉन’ हा अमिताभ बच्चन यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत गणला जातो. या चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. चित्रपटातील गाणी आणि संवाद खूप गाजले होते. या चित्रपटातील सगळेच संवाद दमदार असले, तरी “डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है” हा संवाद विशेष गाजला.


हेही वाचा :


Amitabh Bachchan 80th Birthday: बिग बींना वाईट काळात 'तो' टर्निंग पॉईंट मिळाला अन् जिथं निवृत्ती घ्यायला हवी तिथून घेतली भरारी


Amitabh Bachchan Birthday: ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचा जल्लोष, चाहत्यांची ‘जलसा’ बाहेर गर्दी!