Aditya Narayan : केवळ प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा अशी ओळख न मिळवता, आदित्य (Aditya Narayan) याने स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूड विश्वात आपले स्थान निर्माण केले. गायक, अभिनेता आणि होस्ट अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आदित्य नारायण याचा आज (6 ऑगस्ट) वाढदिवस आहे. आदित्य नारायण यांचा जन्म 6 ऑगस्ट 1987 रोजी झाला. आदित्यने लहानपणापासून अभिनय करण्यास आणि गाणी गाण्यास सुरूवात केली होती. सध्या छोट्या तो होस्ट बनून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.


संगीताचा वारसा मिळालेल्या आदित्यने अगदी बालपणीच सुरांचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. आदित्यने बालकलाकार म्हणून 100हून अधिक गाण्यांना आवाज दिला होता आणि पुरस्कारही जिंकले होते. आदित्य त्याच्या मनमोहक आवाजाने प्रेक्षकांची आणि श्रोत्यांची माने जिंकतो.


वयाच्या चौथ्या वर्षी गायनास सुरुवात!


गायनाची पार्श्वभूमी असणाऱ्या घरातच आदित्यचा जन्म झाला. त्याचे वडील प्रसिद्ध गायक उदित नारायण आणि आई दीपा नारायण. आदित्यचे शिक्षण मुंबईतच झाले. पण, अभ्यासासोबतच आदित्य नारायणने अगदी लहान वयातच गायनाची सुरुवात केली. वयाच्या चौथ्या वर्षी त्याने पहिले गाणे गायले. आदित्य लहानपणी 'लिटिल वंडर्स' या व्यासपीठावर गायचा. इतकच नाही तर, आदित्यने कल्याणजी विरजी शहा यांच्याकडून गायनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले आहे.


कमी वयातच बॉलिवूड एन्ट्री!


आदित्यने 1992मध्ये ‘मोहिनी’ चित्रपटासाठी पहिले गाणे गायले. त्यानंतर त्याने ‘रंगीला’ चित्रपटात आशा भोसले यांच्यासोबत एक गाणे गायले. 1995मध्ये त्याने वडील उदित नारायण यांच्यासोबत 'अकेले हम अकेले तुम' हे गाणे गायले होते. आदित्यने केवळ गायक म्हणूनच नाही तर, अभिनेता म्हणून देखील लोकांना परिचित आहे. लहानपणापासूनच त्याने अभिनेता म्हणूनही काम करायला सुरुवात केली होती. एका कार्यक्रमात, सुभाष घई यांनी आदित्यला पाहिले आणि शाहरुख खान- महिमा चौधरी अभिनित ‘परदेस’ या चित्रपटात त्याला पहिली संधी दिली. यात त्याने महिमाच्या भावाची भूमिका केली होती. यानंतर, आदित्य सलमान खान-ट्विंकल खन्नाच्या 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटामध्येही झळकला होता. यात त्याने सलमान खानच्या मुलाची भूमिका केली होती.


1996च्या ‘मासूम’ चित्रपटातील 'छोटा बच्चा जान के हमको' या त्याच्या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या गाण्यासाठी आदित्यला सर्वोत्कृष्ट बालगायकाचा पुरस्कारही मिळाला. आदित्यने लंडनमधून संगीताचा अभ्यास पूर्ण केला आणि त्यानंतर 2007 मध्ये ‘सा रे ग म पा’मध्ये अँकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आदित्यने अनेक शो होस्ट केले आणि अँकर म्हणून तो हिट ठरला.


अभिनय कारकीर्द सुरु झाली अन् संपली!


बालकलाकार म्हणून आदित्यला चांगलीच वाहवा मिळाली. मात्र, मुख्य अभिनेता म्हणून तो आपली जादू दाखवू शकला नाही. 2009मध्ये आलेल्या 'शपित' चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले होते. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगलाच फ्लॉप झाला आणि आदित्य नारायणची अभिनेता म्हणून कारकीर्दही या चित्रपटामुळे फ्लॉप झाली.


हेही वाचा :


Aditya Narayan : आदित्य नारायणने लाडक्या लेकीची पहिली झलक केली शेअर, पाहा फोटो


Aditya Narayan : पहिल्याच चित्रपटच्या सेटवर जुळलं आदित्य-श्वेताचं सूत, 10 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर बांधली लग्नगाठ!