Shahu Chhatrapati : गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरत आहेत. आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या (Rajarshi shahu Maharaj) जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 


राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जूनला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते 'शाहू छत्रपती' या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. पोस्टर अनावरण सोहळ्याला या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आणि महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची विशेष  उपस्थिती होती. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह शाहूंचे चरित्र लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, सिनेमाचे दिग्दर्शक वरुण सुखराज, निर्माते डॉ. विनय काटे आणि स्नेहा देसाई या मान्यवरांनी हजेरी लावली होती. 


'शाहू छत्रपती' या सिनेमाचे प्रस्तुतकर्ता डॉ.जितेंद्र आव्हाड आहेत. तर या सिनेमाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा वरुण सुखराज सांभाळणार आहे. विद्रोही फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 




राजर्षी शाहूंचा गौरवशाली इतिहास प्रेक्षकांना पाहायला मिळणार 


राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा महाराष्ट्र आजही अभिमानाने मिरवतो आहे. ब्रिटिशांचा अंमल असतानाही शिक्षण, समता, न्यायावर आधारित तसेच जातीभेद विरहित लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावे, असे स्वप्न ज्यांनी पाहिले आणि त्यासाठी आजीवन कार्यरत राहिले ते कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहूंनी त्यांच्या कारकिर्दीत काळाच्या पुढे असणारे जनकल्याणाचे असंख्य निर्णय घेतले आणि राबवले. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, स्त्रिया, दलित अशा समाजघटकांसाठी राजर्षी शाहूंनी भरीव कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे अशा अग्रगण्य समाजसुधारकांना राजर्षी शाहूंनी सर्वार्थाने सहाय्य केले. राजर्षी शाहूंचा गौरवशाली इतिहास लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना 'शाहू छत्रपती' या भव्य चरित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


Rajarshi shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती; वरुण सुखराज करणार दिग्दर्शन


Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सुभाष सराफ सांगणार अशोक मामांचे मजेशीर किस्से