मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनी गुगलकडून खास डुडल साकारण्यात आलं आहे. दादासाहेबांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटापासून भारतात खऱ्या अर्थानं चित्रपट उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली गेली.


मूळ त्र्यंबकेश्वरचे असणारे फाळके यांनी १९१३ मध्ये पहिला भारतीय सिनेमा तयार केला. 1870 साली त्यांचा जन्म झाला आणि 1944 साली त्यांचं निधन झालं. चित्रपटनिर्मितीच्या अवघ्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 95 सिनेमे आणि 26 लघुपटांची निर्मिती केली.

दादासाहेब फाळके यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. दादासाहेबांनी सुरुवातीला गुजरातमधील गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरु केला. पण तिथं आलेल्या प्लेगच्या साथीमुळे त्यांना ग्रोधा सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी बरेच व्यवसायही केले.

त्यानंतर एकदा मुंबईत 'लाईफ ऑफ ख्रिस्त' हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी स्वदेशी चित्रपट निर्मिती करण्याचा ध्यास घेतला. 1912 साली त्यांनी आपला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला पहिला मूकपट प्रदर्शित केला.