मुंबई : सूरांचा बादशाह अर्थात दिवंगत गायक मोहम्मद रफी यांची आज 93 वी जयंती आहे. आपल्या आवाजाने तमाम कानसेनांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायकाला गूगलने डूडलच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे.
मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील कोटला सुल्तान सिंह गावात झाला. एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या या अवलियाने पुढे जाऊन भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या सुरेल आवाजाने साऱ्यांनाच मोहात पाडले.
लाहोरमध्ये उस्ताद वाहिद खान यांच्याकडून रफींनी संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर गुलाम अलीखान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं.
वयाच्या 13 व्या वर्षी रफींनी पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावर गाणं गायलं आणि यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या संगीतकार श्याम सुंदर यांना त्यांचं गाणं आवडलं. श्याम सुंदर यांनी रफींना मुंबईत बोलावलं. त्यानंतर 'सोनिये नी हिरीये नी' हे पहिलं गाणं रफींनी 'गुल बलोच' या पंजाबी सिनेमासाठी गायलं. 1944 साली नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'हिन्दुस्तान के हम है पहले आप के लिए गाया' हे पहिलं हिंदी गाणं गायलं आणि नंतर असंख्य गाण्यांमधून आपल्या आवाजातली जादू त्यांनी दाखवून दिली.
हिंदी सिनेसृष्टीतील गायकांपैकी सर्वश्रेष्ठ गायकांच्या यादीत मोहम्मद रफींचं नाव घेतलं जातं. संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. या पुरस्कारांपेक्षा त्यांना अपेक्षित असलेला रसिकवर्ग त्यांना मोठ्या संख्येने लाभला.
31 जुलै 1980 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आवाजाच्या जादूगाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र आवाजाच्या रुपातून रफी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.