मुंबई : खिलाडी अक्षय कुमार, करीना कपूर, पंजाबी अभिनेता दिलजित दोसांझ आणि रकुल प्रीत सिंह यांचा 'गुड न्यूज' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रदर्शनाच्या दिवशी चांगली ओपनिंग मिळाली. त्यानंतर चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई अक्षय कुमारसह इतर कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठी गुड न्यूज ठरली आहे.
'गुड न्यूज'ने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) 17.56 कोटी रुपयांची ओपनिंग मिळवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 21.78 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी जवळ जवळ 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन्ही दिवसात मिळून 'गुड न्यूज'ने 39.34 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते चित्रपट तिसऱ्या दिवशी अजून जास्त कमाई करेल. काही विश्लेषकांनी 'गुड न्यूज' रविवारी (आज) 25 कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच 'गुड न्यूज'ला वर्षअखेर (31 डिसेंबर) आणि नव्या वर्षाचा पहिला दिवसाच्या (1 जानेवारी) सुट्ट्यांचा अधिक फायदा मिळेल. त्यामुळे 'गुड न्यूज' एका आठवड्यात शंभर कोटी क्लबमध्ये स्थान मिळवेल, असेही बोलले जात आहे.
चित्रपटाचा विषय काय?
अलिकडे आपल्याकडे खूप फॅमिली प्लॅनिंग होतं. पाच-पाच सात-सात वर्ष थांबून मग गोड बातमी देण्याबद्दल विषय सुरू होतात. पण यात वय वाढतं. शरीरातही बदल होत असतात. मग अपत्य प्राप्तीची शक्यता धूसर होऊ लागते. अशावेळी सायन्स मदतीला येतं. आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी यांसारखे पर्याय येतात. 'गुड न्यूज' या चित्रपटात आयव्हीएफ तंत्रज्ञानाची कास धरून गोष्ट मांडण्यात आली आहे. नामसाधर्म्यामुळे ही टेस्ट करताना एकमेकांचे (अक्षय कुमार - दिलजित दोसांझ) स्पर्म एकमेकांच्या बायकोच्या (करीना कपूर - रकुल प्रीत सिंह) शरीरात सोडले जातात असं याचं कथाबीज. पण याच्या अलिकडे आणि पलिकडे गोष्ट रचून दिग्दर्शकाने धमाल उडवून दिली आहे. लग्नानंतर काळ उलटतो तसे नातेवाईकांकडून मारले जाणारे टोमणे.. अपत्य प्राप्तीसाठी उत्सुक असल्यानंतर विशिष्टवेळी जवळ येण्याचा पत्नीचा ह्ट्ट, यातून यंत्रवत होत जाणारं नातं असे पदर यात मांडले आहेत.