सिनेमाचा दिग्दर्शक कोण आहे त्यावर हा सिनेमा कसा असेल? याचा अंदाज बांधता येतो. राज मेहता हे नाव तसं फार लोकांना माहीत नसेल. पण त्यांचा यापूर्वी आलेला सिनेमा होता 'बद्रिनाथ की दुल्हनिया'. म्हणजे हा दिग्दर्शक सतत काहीतरी सांगतो. शिवाय कोणताही अविर्भाव न बाळगता सांगण्याचा प्रयत्न करतो. 'गुड न्यूज' हा सिनेमा याला अपवाद नाही. फारच भारी संकल्पना घेऊन दिग्दर्शक मैदानात उतरला आहे आणि जाता जाता मस्त मेसेजही देऊन गेला आहे.


अलिकडे आपल्याकडे खूप फॅमिली प्लॅनिंग होतं. पाच-पाच सात-सात वर्ष थांबून मग गोड बातमी देण्याबद्दल विषय सुरू होतात. पण यात वय वाढतं. शरीरातही बदल होत असतात. मग अपत्य प्राप्तीची शक्यता धूसर होऊ लागते. अशावेळी सायन्स मदतीला येतं. आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी यांसारखे पर्याय येतात. इथेही आयव्हीएफ विज्ञानाची कास धरून गोष्ट मांडण्यात आली आहे. नामसाधर्म्यामुळे ही टेस्ट करताना एकमेकांचे स्पर्म एकमेकांच्या बायकोच्या शरीरात सोडले जातात असं याचं कथाबीज. पण याच्या अलिकडे आणि पलिकडे गोष्ट रचून दिग्दर्शकाने धमाल उडवून दिली आहे. लग्नानंतर काळ उलटतो तसे नातेवाईकांकडून मारले जाणारे टोमणे.. अपत्य प्राप्तीसाठी उत्सुक असल्यानंतर विशिष्टवेळी जवळ येण्याचा पत्नीचा ह्ट्ट, यातून यंत्रवत होत जाणारं नातं असे पदर यात मांडले आहेत पण भन्नाट पद्धतीने.


हे सगळं होऊनही जेव्हा, हा अदलाबदलीचा प्रकार होतो, तेव्हा या संपूर्ण विषयाला चेष्टेवारी होऊ न देण्याची खबरदारी दिग्दर्शकाने घेतली आहे. अक्षयकुमार, करीना कपूर ही जोडी यापूर्वीही आपल्यााला अनेक सिनेमांमध्ये दिसली आहे. त्याचं आपापसातलं ट्युनिंग मस्त आहेच. त्याचा मोठा फायदा सिनेमाला झाला आहे. छोट्या छोट्या टोमण्यांनी नवरा-बायकोचं हे रिलेशन कमाल वठलं आहे. यात बाजी मारली आहे ती दिलजित दोसांझने. दिलजित आणि कियारा ही जोडी या सिनेमात आहे. यात दिलजितने धमाल उडवली आहे. इंग्रजी न कळणारा, हॅप्पी गो लकी हनी पाहताना हसून मुरकुंडी वळते. दोन्ही मिस्टर बत्रा साकारताना पुरषी मानसिकतेचा अंडरकरंट यात अफलातून आहे. म्हणजे पत्नीच्या गर्भात आपलं मूल नसल्याने इंटरेस्ट न घेणारा एक नवरा. तर दुसऱ्याच्या पत्नीच्या गर्भात आपले जीन्स गेल्यामुळे आपल्या पत्नीची सोडून तिची काळजी घेणारा दुसरा नवरा हा पदर जबर आहे. त्याचवेळी दोन बायकांची मनोवस्थाही दिग्दर्शकाने सोडलेली नाही. यात कौशल्य आहे ते लेखिकेचं.


हा सिनेमा भरपूर मनोरंजन करतो. यातली गाणी.. यातली कॉमेडी आणि मेसेज करेक्ट मापात आहेत. त्यामुळे तो कुठेही रटाळ होत नाही. आदिल हुसेन आणि टिस्का चोप्रा यांच्या भूमिकाही मजेदार आहेत. खूप छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने टिपल्या आहेत. अगदी डॉक्टरचं बॉयला चापटी मारणंही कडक आहे. हा सिनेमा जरुर बघायला हवा. फुल मनोरंजन आणि थोडं अंजन असं कॉम्बिनेशन यात आहे. यात कुठेही बेगडीपणा नाही. हिडीस काही नाही. मग आणखी काय हवं..?