अनुष्का-विराटला देशद्रोही ठरवणाऱ्या नेत्याला गंभीरचं उत्तर
एबीपी माझा वेब टीम | 21 Dec 2017 12:56 PM (IST)
लग्न कुठे करावं, हा अनुष्का आणि विराटचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे.
नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीत लग्न केल्यामुळे त्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजप आमदारावर क्रिकेटपटू गौतम गंभीरने ताशेरे ओढले आहेत. लग्न हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचा मुद्दा गंभीरने उपस्थित केला आहे. 'लग्न कुठे करावं, हा अनुष्का आणि विराटचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना निवडीचं स्वातंत्र्य आहे. कोणालाही त्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. अशाप्रकारची वक्तव्यं करताना नेत्यांनी काळजी घ्यायला हवी.' असं मत गंभीरने व्यक्त केलं आहे. मध्य प्रदेशातील गुणा भागातील भाजप आमदार पन्नालाल शाक्य शाळेतील विद्यार्थ्यांना देशाशी एकनिष्ठ राहण्याविषयी व्याख्यान देत होते. त्यावेळी त्यांच्या निशाण्यावर विराट कोहली आला. परदेशात जाऊन लग्न केल्यामुळे त्यांनी कोहलीवर तोंडसुख घेतलं. ''देशासाठी खेळणाऱ्या विराट कोहलीने परदेशात जाऊन अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. याला देशभक्ती नाही म्हणत. देशातला पैसा परदेशात खर्च करणं चुकीचं आहे. तुम्ही देशासाठी खेळता, पैसा कमावता आणि लग्न परदेशात जाऊन करता. याला देशभक्ती नाही, देशद्रोह म्हणातात'', असं पन्नालाल शाक्य म्हणाले.