मुंबई : सनी देओलने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. घायल, घातक, दामिनी, जिद्दी असे अनेक. या सगळ्यात कडी केली होती ती गदर सिनेमाने. 2001 मध्ये आलेल्या गदरने धमाका केला. आमिषा पटेल आणि सनी देओल यांच्या गदर सिनेमातली गाणी तर गाजलीच शिवाय, सनीने रंगवलेला तारासिंग लोकांना आवडला. आता तब्बल 20 वर्षांनी गदरमधला हा तारासिंग पुन्हा एकदा पाकिस्तानात जाणार आहे. आणि तीच असणार आहे गदर 2 ची गोष्ट. 


2001 मध्ये गदर सिनेमा आला खरा. पण त्याच वेळी आलेल्या लगानमुळे सनी देओल विरुद्ध आमीर खान असा सामना रंगला होता. लगान आणि गदर यापैकी कोणता सिनेमा हिट ठरेल याचे कयास बांधले गेले. पण लोकांना दोन्ही सिनेमे आवडले. प्रत्येक सिनेमाचा क्राऊड वेगळा असतो, त्या सिनेमांना प्रेक्षकांनी जिंकवलं. सकिनाला शोधायला गेलेल्या तारासिंगचाा अवतार लोकांना आवडला. त्यानंतर अनिल शर्मा यांंनी देओल कुटुंबियांना घेऊन अपने बनवला होता. आता शर्मा यांना गदर 2 ची गोष्ट सुचली आहे. त्यातलं नेमकं कथानक काय असेल ते नीट कळलं नसल तरी वन लाईन बाहेर आली आहे. आता तारासिंग पुन्हा एकदा पाकिस्तान गाठणार आहे, पण यावेळी तारासिंग आपल्या मुलासाठी, चरणसिंगसाठी पाकिस्तानला जाणार आहे. 


याबद्दल अधिकृत महीती कुणीच देताना दिसत नाही, पण मिळालेल्या माहितीनुसाार या सिनेमाची गोष्ट तयार होते आहे. आणि विशेष बाब अशी की या सिनेमात अनिल शर्मा यांना आपल्या मुलाला उत्कर्ष शर्मा याला सिनेमात घ्यायचं आहे. त्यामुळे गदर 2 बनला तर या सिनेमात सनी देओल आणि उत्कर्ष असे दोन चेहरे बघायला मिळणार असल्याची शक्यता आहे. सिनेमाच्या गोष्टीवर अद्याप काम चालू आहे. अजून पटकथा, संवाद तयार व्हायला वेळ आहे. अनिल शर्माही सध्या अपनेच्या सिक्वेलमध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे अपनेचा पुढचा भाग तयार झाल्यानंतर गदर 2 च्या चित्रिकरणाकडे देओल आणि शर्मा वळतील. 2022 मध्ये या सिनेमाचं चित्रिकरण पूर्ण होईल असं सध्या भाकित वर्तवलं जातंय. 


अलिकडच्या काळात अनेक सिनेमांच्या सिक्वेललाा सुरूवात झाली आहे. अपने 2 हा तर बनतो आहे. गदर 2 चीही तयारी चालू आहे. शिवाय, टायगर 3 चं चित्रिकरणही सुरू झालं आहे. अक्षयकुमार आणि परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेल्या ओह माय गॉड 2 या सिनेमाचं चित्रिकरणही नुकतंच सुरू झालं. दिग्दर्शक प्रियदर्शन हेराफेरी 3 ची तयारी करू लागलेत. हंगामा 2 या सिनेमाच्या चित्रिकरणालाही सुरूवात झाली आहे. मर्दानी 3 चीही तयारी मधल्या काळात सुरू होती. त्यामुळे पुढच्या दोन वर्षात अनेक सिनेमांचे सिक्वेल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.