मुंबई : एक किंवा दोन नव्हे, तर एकूण पाच सिनेमे आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बाजार, 5 वेडिंग्स, काशी : इन सर्च ऑफ गंगा, दशहरा आणि द जर्नी ऑफ कर्मा हे पाच सिनेमे आज प्रदर्शित होणार आहेत. सगळेच सिनेमे बहुप्रतीक्षित असल्याने या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी टक्कर असेल.

बाजार : सैफ अली खान, राधिका आपटे, चित्रांगदा सिंह आणि रोहन मेहरा या कलाकारांची मुख्य भूमिका असलेला 'बाजार' सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. सैफ यात 'शकुन कोठारी' नामक व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. देशात अंबानी किंवा टाटांचं नाणं चालण्याऐवजी एकच नाणं चाललं पाहिजे, ते म्हणजे 'शकुन कोठारी', अशा अविर्भावात सैफची भूमिका सिनेमाभर वावरत असल्याचे ट्रेलरमधून दिसते. दम मारो दम, कुछ न कहो यांसाराखे सिनेमे दिग्दर्शित केलेल्या गौरव चावला यांनीच बाजार सिनेमाही दिग्दर्शित केलाय.



काशी : इन सर्च ऑफ गंगा : 'काशी : इन सर्च ऑफ गंगा' सिनेमाचं कथानक वाराणसीत घडतं. प्रसिद्ध अभिनेता शरमन जोशी मुख्य भूमिकेत आहे.  'काशी' असे शरमन जोशीच्या भूमिकेचे नाव आहे. काशी त्याची बेपत्ता बहीण गंगा हिला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. गंगा या व्यक्तिरेखेबाबत या सिनेमात कुतुहल निर्माण करण्यात आले आहे.



द जर्नी ऑफ कर्मा : शक्ती कपूर, पूनम पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला 'द जर्नी ऑफ कर्मा' सिनेमाही आज प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर अत्यंत बोल्ड आहे. आपल्या वयाहून कमी वयाच्या मुलगी आवडत असणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत शक्ती कपूर, तर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठल्याही स्तरापर्यंत जाण्यास तयार असणाऱ्या तरुणीच्या भूमिकेत पूनम पांडे दिसणार आहे. लव्ह, सेक्स आणि धोका या गोष्टींभोवती सिनेमाचं कथानक फिरतं.



फाईव्ह वेडिंग्स : राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेला 'फाईव्ह वेडिंग्स' सिनेमा कॉमेडी ड्रामा आहे. बॉलिवूड वेडिंग्स कव्हर करायला आलेल्या अमेरिकन पत्रकारावर आधारित सिनेमाचं कथानक आहे. अभिनेत्री नर्गीस फाखरीही मुख्य भूमिकेत दिसेल.



दशहरा : पॉलिटिकल क्राईम ड्राम असणारा 'दशहरा' सिनेमाही आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नील नितीन मुकेश मुख्य भूमिकेत आहे. काहीशी हटके कथा असल्याने आज प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये आपलं वेगळेपण हा सिनेमा दाखवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.