Saaho First Day Collection : समीक्षकांच्या टीकेनंतरही 'साहो'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2019 04:26 PM (IST)
बाहुबली प्रभासचा बॉलिवूडमधला डेब्यू असलेला 'साहो' हा चित्रपट काल (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. समीक्षकांच्या पसंतीस न उतरलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मुंबई : बाहुबली प्रभासचा बॉलिवूडमधला डेब्यू असलेला 'साहो' हा चित्रपट काल (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. समीक्षकांच्या पसंतीस न उतरलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु टीकेचा धनी झालेला 'साहो' पहिल्या दिवशी प्रभासच्या चाहत्यांनी तारला आहे, असे म्हणावे लागेल. कारण पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चागंली कमाई केली आहे. 'साहो'ने (हिंदी) पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 24.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईसोबत 'साहो'ने यावर्षी सर्वात मोठी ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. 'साहो'ने आलिया भट्टच्या 'कलंक' आणि अक्षय कुमारच्या 'केसरी' या चित्रपटांच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. 'कलंक'ने पहिल्या दिवशी 21.60 कोटी तर 'केसरी'ने पहिल्या दिवशी 21.06 कोटी रुपयांची कमाई केली होती. यावर्षी सर्वात मोठी ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सलमान खानचा 'भारत' चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. 'भारत'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 42.30 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल'ने 29.16 कोटी रुपयांची कमाई केली होती.