मुंबई : धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, मेरी मेहबुबा, कितना हसीन चेहरा यासारख्या गाजलेल्या गाण्यांचे पार्श्वगायक कुमार सानू अडचणीत येण्याची शक्यता आहे. कुमार सानूंविरोधात बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. रात्री दहा वाजल्यानंतर लाऊडस्पीकर सुरु ठेवल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये सोमवारी रात्री एका शाळेच्या आवारात कुमार सानू यांची कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. मात्र या कॉन्सर्टमध्ये पहाटेपर्यंत परफॉर्मन्सच सुरुच होते. त्यावेळी काही रहिवाशांनी लाऊडस्पीकरच्या दणदणाटामुळे त्रास होत असल्याची तक्रार दाखल केली.

इव्हेंटचे आयोजक अंकित कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचं 'एएनआय'ने म्हटलं आहे. कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली, मात्र काही मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख आहे.


नव्वदच्या दशकात कुमार सानू यांनी गायलेल्या गाण्यांचं चाहत्यांवर प्रचंड गारुड होती. नदीम-श्रवण, जतिन-ललित, अनू मलिक यासारख्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी सानू यांनी गायली होती. मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगूसह 30 भाषांमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळाला.

कुमार सानूंनी गायलेल्या सुपरहिट गाण्यांमध्ये धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना (आशिकी), मेरी मेहबुबा (परदेस), कितना हसीन चेहरा (दिलवाले), तेरे दर पे सनम (फिर तेरी कहानी याद आयी) यांचा समावेश आहे.