Films Based On Kashmir : तब्बल तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर आज (20 सप्टेंबर) काश्मीरमध्ये (Kashmir) पुन्हा एकदा थिएटर सुरु झाले आहेत. पुन्हा एकदा काश्मीरवासियांना (Kashmir) मोठ्या पडद्यावर चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. गेली 30 वर्ष काश्मीरचे लोक मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहू शकले नसले, तरी या काळात काश्मीरचं चित्रण करणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी केवळ देशातच नाही, तर जगभरात धुमाकूळ घातला होता. काही चित्रपटांमध्ये काश्मीरचं सुंदर चित्रण करण्यात आलं आहे. तर, काहींनी थेट वास्तविकतेचं दर्शन घडवलं आहे. काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आधारित हे बॉलिवूड चित्रपट एकदा तरी नक्कीच पाहायला हवेत...


रोजा (Roja)


‘रोजा जानेमन...’ आजही हे गाणं टीव्हीवर लागलं की, या गाण्यात दाखवलेलं काश्मीरचं निसर्गसौंदर्य प्रेक्षकांचं मन मोहवून टाकतं. मणीरत्नम यांचा हा चित्रपट एका अशा महिलेच्या कथेभोवती फिरतो जी आपल्या पतीचा शोध घेत आहे. एका मिशन दरम्यान काश्मीरमधील अतिरेकी तिच्या पतीचे अपहरण करतात. याच चित्रपटातून एआर रहमान यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. या चित्रपटाने समीक्षकांची वाहवा तर मिळवलीच, पण अनेक पुरस्कारांवर देखील नाव कोरलं. या चित्रपटात दाखवलेला काश्मीरमधील राजकीय संघर्ष आणि कथेतील बारकावे प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवतात.



हैदर (Haider)


बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता इरफान खान अभिनित ‘हैदर’ या चित्रपटाची कथा शेक्सपियरचे प्रसिद्ध नाटक ‘हॅम्लेट’वर आधारित होती. या चित्रपटात काश्मीरमधील निसर्ग सौंदर्य आणि प्रसिद्ध लाल चौकाचे चित्रण करण्यात आले आहे. ‘हैदर’ हा चित्रपट काश्मीरच्या पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीवर भाष्य करणारा आहे. हैदरमध्ये शाहिद कपूर मुख्य अभिनेता आहे. तर, या चित्रपटात तब्बूने त्याच्या आईची भूमिका साकारली आहे. एक मुलगा आपल्या हरवलेल्या वडिलांना शोधण्यासाठी भारतात परततो आणि त्याचा प्रवास सुरु करतो. या चित्रपटाने देखील प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.



हाफ विडो (Half Widow)


अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाव गाजवत पुरस्कार पटकावणारा, डॅनिश रेन्झू दिग्दर्शित 'हाफ विडो’ या चित्रपटात नीला नावाच्या एका स्त्रीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. काश्मीरमध्ये राहणाऱ्या नीलाच्या पतीचे अपहरण करण्यात आलेले असते. पतीचे अपहरण झाल्यावर त्याच्या शोध घेत स्वतःचं रक्षण करणारी नीला अनेक संकटांचा सामना करते. स्थानिक भाषेत असलेला हा चित्रपट काश्मीरच्या दाहक वास्तव परिस्थितीचं चित्रण दाखवतो. काश्मीरमध्ये चित्रपटगृह नसल्यामुळे हा चित्रपट शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. पती हरवलेल्या स्त्रीला 'आधी-बेवा' अर्थात अर्धी विधवा का म्हटले जाते, याचं चित्रण यात पाहायला मिळतं.



शौर्य (Shaurya)


समर खान दिग्दर्शित ‘शौर्य’ हा चित्रपट 2008मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात के के मेनन, राहुल बोस, जावेद जाफरी, दीपक डोबरियाल आणि मिनिषा लांबा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘शौर्य’ हा चित्रपट स्वदेश दीपकच्या ‘कोर्ट मार्शल’ या हिंदी नाटकापासून प्रेरित आहे. तर, 1992च्या टॉम क्रूझ अभिनित कोर्टरूम ड्रामा ‘अ फ्यू गुड मेन’चा अधिकृत रिमेक आहे. इस्लाम आणि दहशतवाद अशा दोन बाजूंवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने समीक्षकाकांडून कौतुकाची थाप मिळवली होती. अतिशय संवेदनशील मुद्दे यात हाताळण्यात आले होते.



'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files)


'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या झालेल्या हत्या आणि त्याच्यांवरील अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. या चित्रपटात पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. काश्मीरमधी; पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे दाहक वास्तव दाखवणारा हा चित्रपट पाहून प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.



हेही वाचा :


Theaters In Kashmir : तीन दशकांची प्रतीक्षा अखेर संपली! आता काश्मीरमध्ये मोठ्या पडद्यावर पाहता येणार चित्रपट!