बंगळुरु : कन्नड चित्रपटातील स्टंटबाजी दोन कन्नड अभिनेत्यांच्या जीवावर बेतल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हेलिकॉप्टरमधून तलावात उडी मारण्याच्या सीननंतर उदय आणि अनिल हे दोन अभिनेते बेपत्ता झाले आहेत. दोघंही पाण्यात बुडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बंगळुरुच्या पश्चिम भागातील मागदी रोडवर असलेल्या तिप्पागोंदानहल्ली तलावात 'मस्ती गुडी' या कन्नड चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. विजय, अनिल आणि उदय या तीन अभिनेत्यांनी हेलिकॉप्टरमधून तलावात उडी मारली. विजयने पोहून तलावाचा किनारा गाठला, मात्र अनिल आणि उदय या अभिनेत्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.



निष्णात जलतरणपटू तलावामध्ये दोन्ही बेपत्ता अभिनेत्यांचा शोध घेत आहेत, मात्र पोलिसांनी दोघं वाचण्याची शक्यता धुसर असल्याचं म्हटलं आहे. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुरक्षेचे आवश्यक ते उपाय न योजल्याचा आरोप होत आहे, त्याचप्रमाणे या सीनचा सराव न झाल्याचंही म्हटलं जात आहे.

दुनिया विजय या एकाच अभिनेत्याला सेफ्टी हार्नेस (हेलिकॉप्टरला जोडलेली दोर) वापरल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे शूटिंगच्या वेळी अॅम्ब्युलन्स किंवा स्पीड बोट्स नसल्याचाही दावा केला जात आहे. 'मस्ती गुडी' चित्रपटाच्या युनिट विरोधात केस दाखल करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.



पाहा व्हिडिओ :