मुंबई: अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीनं हायकोर्टात धाव घेत, जियाची आई राबिया खान ही एकामागोमाग एक अर्ज दाखल करून, सत्र न्यायालयातील खटल्यात निव्वळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे.
तसेच सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी सुरज पांचोलीनं हायकोर्टात केली आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. हायकोर्टानं यावर राबिया खानला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत. त्याचबरोबर सत्र न्यायालयालाही स्पष्ट निर्देश दिलेत की, हायकोर्टात अर्ज दाखल झाला याचा अर्थ सत्र न्यायालयातील खटल्याला स्थगिती मिळाली असा होत नाही, सत्र न्यायालयानं आपलं कामकाज सुरू ठेवावं.
सरकारी वकिलाच्या नियुक्तीपासून तपासयंत्रेणेच्या अहवालापर्यंत प्रत्येक गोष्टीवर जिया खानची आई राबिया खाननं आक्षेप घेतलाय. तसेच सध्या तिनं स्वत: या खटल्यात बाजू मांडण्याची परवानगी मागितली आहे. तिच्या या विनंतीला स्पष्ट नकार देत हायकोर्टानं तिला न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची जाणीव करून दिली.
प्रथम तक्रारदार या नात्यानं ती या खटल्यात बाजू मांडू शकत नाही, त्यामुळे तिला राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांचीच मदत घ्यावी लागेल असंही हायकोर्टानं स्पष्ट केलंय.
अभिनेत्री जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीला 2013 मध्ये अटक झाली होती. तेव्हा पासून हा खटला मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे.
जिया खानची आत्महत्या
3 जून 2013 रोजी जिया खान तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. सुरुवातीला जियाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला होता. पण, जियाच्या आत्महत्येसाठी सुरज पांचोली जबाबदार असल्याचा आरोप जियाच्या आईने केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेमार्फत करावा, अशी मागणी राबिया खान यांनी केली होती. त्यानुसार 10 जून रोजी पोलिसांनी सूरज पांचोलीला अटक केली होती. तर, 2 जुलै 2013 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सूरज पांचोलीला जामीन देत त्याची सुटका केली होती.
दरम्यान जिया खान प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. जियाची हत्या झाली नसून तिने आत्महत्या केल्याचा अहवाल सीबीआयने न्यायालयात दिला आहे. त्यावर राबिया खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात आक्षेप नोंदवला आहे.