मुंबई : FAU-G या गेमची प्रतीक्षा संपली आहे. रविवारी (25 ऑक्टोबर) या गेमचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या गेमचा टीझर रिलीज झाला आहे. अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर FAU-G चा टीझर शेअर केला आहे. या टीझरच्या पहिल्याच सीनमध्ये गलवान खोऱ्यात उड्डाण करणारे हेलिकॉप्टर दिसत आहेत. हा गेम नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणार आहे.


टीझर शेअर करताना अक्षय कुमारने लिहिलं आहे की, "असत्यावर सत्याचा विजय असा आजचा दिवज आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक असलेल्या फौजींसाठी जल्लोष साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता दिवस असू शकतो? दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर फौजीचा टीझर सादर करत आहे."





कमाईतील काही वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान करणार
अक्षय कुमारे दोन महिन्यांपूर्वी या गेमची घोषणा केली होती. त्यावेळी अक्षय कुमारने म्हटलं होतं की, "पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर अभियानाला पाठिंबा म्हणून हा अॅक्शन गेम सादर करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. निडर आणि एकतेचं प्रतिक गार्ड्स - फौजी. मनोरंजनातून खेळाडूंना आपल्या सैनिकांचा त्याग समजण्यास मदत होईल. या मोबाईल गेममधून मिळणाऱ्या महसुलाचा 20 टक्के वाटा भारताच्या वीर ट्रस्टला दान केला जाणार आहे."


PUBG वर बंदी घातल्यानंतर FAU-G ची घोषणा
गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर केंद्र सरकारने 29 जून रोजी 59 चिनी अॅप्स, 27 जुलै रोजी 47 अॅक्स आणि 2 सप्टेंबरला 118 अॅप्स बॅन केले होते. यामध्ये पब्जी, टिकटॉकसारख्या अॅप्सचा समावेश आहे. या अॅपवर बंदी असली तरी मोबाईल आणि डेस्कटॉप व्हर्जन अजूनही उपलब्ध आहेत. केंद्राच्या या निर्णयानंतर अक्षय कुमारने FAU-G या गेमची घोषणा केली होती. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी FAU-G या गेमबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या.