पंजाब : पंजाबमधील पठाणकोटमधील एका कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्याला कटूता विसरण्याचा सल्ला दिला, पण बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांचं उदाहरणही दिलं. घटस्फोटानंतरही हृतिक रोशनचे त्याची घटस्फोटित पत्नी सुझान खानशी मैत्रीचे संबंध आहे. तसंच गौरी लंकेश यांचेही घटस्फोटित पतीसोबतचे संबंध चांगले होते, असं कोर्टाने सांगितलं.


सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल अनिल काबोत्रा यांचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकारत कौटुंबिक कोर्टाचे न्यायाधीश रमेश कुमारी म्हणाले की, "हे जग अशा उदहरणांनी भरलेलं आहे, जिथे घटस्फोटित दाम्पत्य मित्र म्हणून राहतात आणि शांततने आयुष्य व्यतीत करतात. महत्त्वाची बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचे घटस्फोटित पत्नी सुझान खानसोबत मैत्रीचे संबंध अजूनही कायम आहेत. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी हत्या झालेल्या पत्रकार गौरी लंकेश यांचेही घटस्फोटित पतीसोबतचे संबंध चांगले होते."

70 वर्षीय निवृत्त लेफ्टनंट कर्नल अनिल काबोत्रा यांनी 2015 मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. त्यांच्या पत्नीचं वय 60 वर्ष आहे. कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा अर्ज स्वीकारला आहे. पत्नीच्या खोट्या आरोपांमुळे अनिल काबोत्रा यांना मानसिक आणि शारीरिक त्रास भोगावा लागला, हेदेखील कोर्टाने मान्य केलं. क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट घेण्याचा अधिकार त्यांना कोर्टाने दिला आहे.

पोटगीची मागणी करणारी लेफ्टनंट कर्नल यांच्या पत्नीची याचिका कोर्टाने मागील आठवड्यातच फेटाळली होती. "चुकी करणाऱ्याला केवळ स्त्री पुरुष समानतेच्या आधारावर भरपाई दिली जाऊ शकत नाही. पत्नीने आपल्या संपूर्ण सेवेत लेफ्टनंट कर्नल यांच्या पेन्शनपेक्षाही जास्त पगार घेतला आहे, अशा परिस्थितीत तर भरपाई मिळणं शक्यच नाही," असं कोर्टाने म्हटलं आहे.