मुंबई : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा होती. कुटुंबीयांसोबत भांडण झाल्यानंतर ऐश्वर्याने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, असा मेसेज पसरत होता.
या अफवेनुसार 'ऐ दिल है मुश्किल'दरम्यान रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायच्या बोल्ड फोटशूटमुळे बच्चन कुटुंब नाराज होतं. यामुळे कुटुंबात आलबेल नव्हतं.
इतकंच नाही तर ऐश्वर्याची परिस्थिती पाहून बच्चन कुटुंबीयांनी तातडीने डॉक्टरला कॉल केला. मीडियामध्ये हे वृत्त पसरु नये यासाठी घरातच तिच्यावर उपचार केली, अशी अफवाही पसरली होती.
पण ऐश्वर्याच्या आत्महत्येसंदर्भातील बातम्या केवळ एक अफवा होत्या. तिच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, या उद्देशाने ही बातमी पसरवण्यात आली होती. यानंतर ऐश्वर्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त पूर्णत: चुकीचं असल्याचं सांगितलं. तसंच मी ठणठणीत आहे, असंही ऐश्वर्याने स्पष्ट केलं.
ऐश्वर्या सध्या नुकताच प्रदर्शित झालेला 'ऐ दिल है मुश्किल'चं यश सेलिब्रेट करत आहे. शिवाय कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे.