मुंबई: ऑस्करसाठी सिनेमा गेल्यानंतर नेमकं काय होतं हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही. ऑस्कर पुरस्कारासाठी नेमके किती ज्युरी असतात, ते कसं मतदान करतात.. गुण किती देतात.. असे देतात.. आपण कुठे कमी पडतो, याबद्दल आपल्याशी बोलते झाले आहेत, गेल्या दोन वर्षापासून ऑस्करसाठीचे ज्युरी म्हणून काम केलेले भारतातील ऑस्करचे समन्वयक उज्ज्वल निरगुडकर.

'एबीपी माझा'च्या 'यूट्यूब' चॅनेलसाठी खास दिलेल्या मुलाखतीत निरगुडकर यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. आपले सिनेमे नेमके कुठे कमी पडतात.. आपण आपल्या सिनेमाचं कसं मार्केटिंग केलं पाहिजे या अनेक विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या. २०१७पासून ते ऑस्करसाठी ज्युरी म्हणून काम पाहतात. गेल्या वर्षी त्यांनी तब्बल अडीचशे सिनेमे पाहून व्होटिंग केलं. तांत्रिक विभागासह या पुरस्काराच्या कशा दोन फेऱ्या पार पडतात तेही त्यांनी सांगितलं. नॉमिनेशन राऊंड आणि फायनल राऊंड अशा दोन भागात ही स्पर्धा होते.

आपल्यापैकीच नव्हे तर मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्यांनाही ऑस्करसाठी सिनेमा गेल्यानंतर नेमकं काय होतं हे माहीत नाही. त्यांच्यासाठी ही मुलाखत म्हणजे एक प्रकारे एक्सप्लेनरच आहे. आहे. ऑस्कर ज्युरी म्हणून निरगुडकर यांची आजीवन नियुक्ती होणं, हीसुद्धा भारतीयांसाठी आणि खासकरून मराठी मनासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. यातून बोध घेऊन 'गली बॉय'ने शहाणं व्हायला हवं तरच, आपला टाईम येईल आणि आपण ऑस्करही घेऊन येऊ.