तेलुगू सुपरस्टार पवन कल्याण स्टारर 'वकील साब' ने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई  केली आहे. कोरोना संकट असताना आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम असताना हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील अनेक थिएटरमधील तिकिट दरही कमी आहेत. तरीही या सिनेमाने पहिल्याच दिवशी 44 कोटींचं कलेक्शन केलं आहे.


'वकील साब'ने दुसर्‍या दिवशी जवळपास 11 कोटींची कमाई केली. पण तिसर्‍या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तिसर्‍या दिवशी चित्रपटाने 45 कोटींची कमाई करत अवघ्या तीन दिवसात 100 कोटींचा कमाईचा टप्पा पार केला. बॉलिवूडच्या यावर्षीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनशी तुलना केली तरी एकट्या पवन कल्याणच्या सिनेमाची कमाई बॉलिवूडच्या कमाईपेक्षा दुप्पट आहे. 


पवन कल्याण स्टारर 'वकील साब' हा 100 कोटींचा व्यवसाय करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यासह अमेरिका आणि इंग्लंडमध्ये चांगली कमाई करत आहे. देश आणि जगातील चित्रपटगृहातील कमाईच्या आधारे अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.



चित्रपटातील  कलाकार


हा चित्रपट 'पिंक' या हिंदी सिनेमाचा रिमेक आहे. तीन मुली कशा एका गुन्ह्यात अडकतात आणि बायोपॉलर डिसऑर्डरने ग्रस्त वकील त्यांना कशी मदत करतो हे यात दाखवलं आहे.  या तेलगू चित्रपटात पवन कल्याणशिवाय निवेता थॉमस, अंजली आणि अनन्या नागल्ला यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर प्रकाश राज देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात श्रुती हसनचा एक कॅमिओ देखील आहे.


दोन हजाराहून अधिक स्क्रीनवर रिलीज 


पवन कल्याणचा कमबॅक चित्रपट पाहून चाहते उत्साहित आहेत. 'वकील साब' जगभरात 2 हजार स्क्रीनवर रिलीज झाला आहे. यापैकी जास्तीत जास्त स्क्रीन्स आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आहेत. कर्नाटकमध्ये हा चित्रपट 300 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय देशभरातही अनेक चित्रपटगृहांत हा सिनेमा रिलीज झाला आहे. 


कोरोना महामारीचा बॉलिवूडला मोठा फटका, 2021 मध्ये आतापर्यंत फक्त 50 कोटीची कमाई


हजारो कोटींची उलाढाल असलेल्या बॉलिवूडसाठी 2020 नंतर 2021 वर्षही निराशाजनक आहे. बॉलिवूड 2000 सालापासूनच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. 2021 चे पहिले तीन महिने संपले आहेत. यावर्षी केवळ रुही (Roohi) चित्रपटाने 25 कोटी कमावले आहेत. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर मुंबई सागाचा (Mumbai Saga) क्रमांक लागतो. ज्याचे बॉलिवूड कलेक्शन 15 कोटी आहे. याखेरीज आणखी बरेच चित्रपट आले ज्यांना 2 कोटींची कमाई देखील करता आली नाही. आतापर्यंत 2021 च्या पहिल्या तिमाहीत बॉक्स ऑफिसवर फक्त 50 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. बॉलिवूडच्या इतिहासात आतापर्यंत असे कधी झाले नव्हते. म्हणजेच, नवीन शतकाच्या सुरूवातीस, 2000 पासूनचा हा सर्वात वाईट काळ आहे.