मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर आणि किंग शाहरुख खान यांची घनिष्ठ मैत्री सर्वश्रुत आहे. मात्र एक गोष्ट वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. करण जोहरने त्याच्या संपत्तीमध्ये चक्क शाहरुख खानच्या दोन मुलांना वाटा दिला आहे.

गेल्या महिन्यात सरोगसीच्या माध्यमातून करण जोहर जुळ्या मुलांचा पिता झाला. करणने आपली संपत्ती स्वतःच्या मुलांसोबतच शाहरुखची मुलं आर्यन आणि सुहाना यांच्या नावे केली आहे. शाहरुख-गौरी यांच्या तिन्ही मुलांना म्हणजे आर्यन, सुहाना आणि अब्रामला आपल्या मुलांप्रमाणे मानतो. याच भावनेतून दोघांमध्ये समसमान वाटणी करण्याचा निर्णय करणने घेतल्याचं म्हटलं जातं.

करणने आपल्या मुलीचं 'रुही', तर मुलाचं 'यश' असं नामकरण केलं आहे. करणचे वडील आणि दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरुन यश, तर आई हिरु जोहर यांच्या नावातील अक्षरांवरुन रुही हे नाव ठेवण्यात आलं आहे.

कंगनाने बॉलिवूड सोडण्याचा विचार करावा : करण जोहर


मुंबईच्या अंधेरी भागातील मसरानी रुग्णालयात 7 फेब्रुवारीला या दोन बाळांचा जन्म झाल्याची माहिती आहे. मात्र महिन्याभरापासून जोहर कुटुंबाने ही गोष्ट उघड केली नाही. वडील म्हणून करणच्या नावाची नोंदणी करण्यात आली असून आईच्या नावाचा उल्लेख नाही.

करण जोहरने यापूर्वी अनेक वेळा पिता होण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यामुळे करण लग्न करणार असल्याची अटकळ बॉलिवूडसह तमाम चाहत्यांनी बांधली होती. मात्र सरोगसीच्या माध्यमातून सिंगल फादर होत करणने या सर्व चर्चांना छेद दिला आहे. भारतात 2002 पासून सरोगसी कायदेशीर आहे, मात्र आई किंवा वडील यांपैकी एक जण दाता असणं बंधनकारक आहे.

‘करण जोहरला कोणतीही चांगली मुलगी मिळाली असती, त्यानं लग्न करायला हवं होतं. लग्न करु शकत नाही, म्हणजे कोणता आजार आहे का? तसं असेल तर त्याने मुलांना दत्तक घ्यायला हवं होतं. पण सरोगसी करण्याचं काय कारण होतं? ’ असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केला.

संबंधित बातम्या :


करण जोहरला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं


जुळ्या मुलांचा पिता करण जोहरवर अबू आझमींची टीका