Eknath Shinde Birthday : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. 'मला तुमचा अभिमान आहे, तुम्ही सगळ्यांच्या बोलण्याला तोंड दिलं आणि यशस्वी झाला. चांगलं काम करत राहा. शतायुषी व्हा', असं आशा भोसले यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी शुभेच्छा संदेश देताना म्हटलं आहे. आशा भोसले यांनी शनिवारी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, या त्यांनी कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आशा भोसलेंकडून एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आशा भोसले यावेळी म्हणाल्या की, "तुम्ही मला फार आवडता. तुम्ही अचानक वरती आलात, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही काम करत होतात. तुम्ही अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली, तशी तुम्ही पुन्हा एकट्याने शिवसेना घडवली, त्यामुळे मला तुमचा अभिमान आहे. कारण, त्यावेळेला सगळं काही निवळलं होतं, त्यावेळी तुम्ही आलात. ज्या हिंमतीने तुम्ही आलात, लोकांच्या बोलण्याला तु्म्ही तोंड दिलं, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळी तुम्ही परिस्थितीला तोंड दिलं आणि यशस्वी झालात आणि आणखी यशस्वी व्हाल, असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. शतायुषी व्हा आणि असंच कार्य करत राहा. चांगलं कार्य केल्याने कुणीही कधीही संपत नाही".
विविध सेवा लोकार्पण सोहळा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. ज्यामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट आणि वेगवान होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे लोकार्पण पार पडणार आहे. राज्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून कर्करोग दिन निदान आणि उपचारासाठी आणि राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे.