मुंबई : नार्कोटीक्स ब्युरो कंट्रोल अर्थात एनसीबीनं शुक्रवारी सिद्धार्थ पीठानी याच्यावर कारवाई करत त्याला हैदराबादमधून अटक केली. ज्यानंतर त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणलं जाणार आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला जोडून सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणातील चौकशीअंतर्गत त्याच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली हा तपास सुरु होता आणि आता साधारण वर्षभरानंतर सुशांतचा मित्र आणि त्याचा मॅनेजर असणाऱ्या सिद्धार्थला षडयंत्र रचल्याचं कारण देत अटक केली आहे.
षडयंत्राचं स्वरुप अद्याप स्पष्ट केलं गेलं नसलं तरीही न्यायालयात ही माहिती सादर कणार असल्याचं एनसीबीकडून सांगण्या येत आहे. सुशांत जे ड्रग्ज घेत होता ते सिद्धार्थकडून पुरवलं जात होतं, अशी धक्कादायक माहिती तूर्तास सूत्रांनी दिली आहे, पण अद्यापही याची स्पष्टोक्ती झालेली नाही.
सिद्धार्थ हा सुशांतचा फ्लॅटमेट, त्याचा मित्र असून, सदर प्रकरणामुळं मुंबई पोलीस, सीबीआय आणि ईडीकडूनही त्याची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, जून 8 ते जून 14, 2020 या काळात नेमकं काय घडलं होतं, याची माहिती सिद्धार्थनं पोलिसांना तपास- चौकशीदरम्यान दिली. दिशा सालियन हिच्या मृत्यूचा सुशांतवर काय आणि कसा परिणाम झाला हेसुद्धा त्यानं सांगितलं असल्याचं कळत आहे.
विकास सिंह या सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबीयांच्या वतीनं हे प्रकरण हाताळणाऱ्या वकिलांनी सिद्धार्थच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. तो अतिशय तरबेत गुन्हेगार आहे. त्यानं असं केलं की, एफआयआर दाखल होईपर्यंत त्यानं रियाचा मदत केली. एफआयआर दाखल होताक्षणीच त्याचं रियाशी वागणं, ती दोषी असल्याच्या चर्चांनी जोर धरल्यावर ई मेल लिहिणं हे सारं संशयास्पद होतं, असं विकास सिंह यांनी म्हटलं होतं.